fbpx

दिवाळीत तरी धान्य मिळणार का?

  •  रेशन कार्डधारकांचा शासनाला सवाल
  • -राज्य शासनाकडून धान्य उपलब्ध होईना

 

पुणे – केशरी शिधापत्रिकाधारकांना नोव्हेंबरपर्यंत धान्य देण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, मागील चार महिन्यांपासून धान्यच शासनाकडून उपलब्ध झाले नाही. ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्य नागरिक धान्यापासून वंचित आहेत. धान्याविना दसरा गेला, आता दिवाळीत तरी धान्य मिळेल का, असा प्रश्न नागरिक विचारत आहे.

 

लॉकडाउनमुळे शासनाने अंत्योदय अन्न योजना व अन्नसुरक्षा योजनेत समावेश नसलेल्या उर्वरित केशरी शिधा पत्रिकाधारकांना नोव्हेंबरपर्यंत गहू व तांदूळ वाटपाचा निर्णय घेतला. मे व जूनमध्ये धान्य मिळाले. मात्र, आता पुढील धान्य मिळण्यासाठी प्रशासनाला अडचणींना सामोरे जावे लागत आहे. केंद्र शासनाने पुढील महिन्यासाठी या योजनेला अद्याप मुदतवाढ दिलेली नाही. तसेच केंद्र शासनाने धान्याच्या दरामध्ये प्रति किलो 50 पैसे, तर 1 रुपयाने वाढ केली आहे.

 

तर राज्य शासनाला भासत असलेली आर्थिक चणचण या कारणांमुळे केशरी रेशनकार्ड धारकांना धान्य वाटपाचा तिढा सुटलेला नाही. केशरी रेशनकार्ड धारकांना गहू प्रति किलो 8 रुपये, तर तांदूळ 12 रुपये प्रति किलो या दराने प्रति व्यक्ती 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ वितरीत करण्यात आले. त्यानंतर राज्य शासनाने ही योजना नोव्हेंबरपर्यंत राबविण्याचा निर्णय घेतला. लॉकडाउनच्या काळात या योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ नागरिकांनी घेतला.

 

पुणे शहरात 4 लाख 60 हजार इतकी केशरी रेशनकार्ड धारकांची संख्या आहे. या नागरिकांना धान्य देण्यासाठी महिन्याला सुमारे 7 हजार 500 मेट्रिक टनाची आवश्यकता भासते. मात्र, धान्यच उपलब्ध होत नसल्याने वितरण करता येत नाही, याविषयी राज्य शासनाकडे पाठपुरवा सुरू असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.