पेड TRP घोटाळा: अर्णब गोस्वामींचे मुंबई पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप

मुंबई – पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आज पत्रकारपरिषदेत पेड टीआरपी घोटाळ्याबाबत माहिती दिली. या प्रकरणाशी संबंधित फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या दोन वाहिन्यांच्या चालकांना ताब्यात घेतले असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना परमबीर सिंग यांनी पेड टीआरपी प्रकरणात रिपब्लिक टिव्हीवरही संशय असल्याचं म्हंटलं.

पोलीस आयुक्तांनी वक्त केलेल्या संशयानंतर आता रिपब्लिक टीव्हीचे समूह संपादक अर्णब गोस्वामी यांनी आपली भूमिका मांडली आहे. याबाबत भूमिका मांडताना आपण परमबीर सिंग यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं म्हंटल आहे.

काय म्हणाले अर्णब गोस्वामी?

अर्णब यांनी मांडलेल्या भूमिकेत, “मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी रिपब्लिक टीव्हीवर खोटे आरोप लावले आहेत. आम्ही सुशांत प्रकरणी त्यांनी केलेल्या तपासावर प्रश्न उपस्थित केल्याने त्यांनी असं केलं आहे. यामुळे रिपब्लिक टीव्ही परमबीर सिंग यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा फौजदारी खटला दाखल करणार आहोत. याबाबत बीएआरसीने सादर केलेल्या कोणत्याही अहवालात रिपब्लिक टीव्हीचे नाव नाही. भारताच्या जनतेला सत्य माहीत आहे.”

“परमबीर सिंग यांनी सुशांत सिंग प्रकरणाचा केलेला तपास संशयाच्या घेऱ्यात असून रिपब्लिक विरोधात उचलण्यात आलेलं हे अविचारी पाऊल आम्ही सुशांत प्रकरण, पालघर प्रकरण व इतर प्रकरणांमध्ये केलेल्या वार्तांकनामुळे उचलण्यात आलं आहे. मात्र असं लक्ष्य करण्यात आल्यानं रिपब्लिकमध्ये काम करणाऱ्या सर्वांचे सत्याला वाचा फोडण्याचा इरादा आणखीनच मजबूत होतो.”

“परम बीर सिंह यांचा आज पूर्णपणे पर्दाफाश झाला आहे. BARC च्या एकही अहवालात रिपब्लिकचे नाव घेण्यात आलं नाही. त्यांनी अधिकृत माफीनामा सादर करून न्यायालयात आमच्याशी सामना करण्यास सज्ज राहावं.” अशी भूमिका अर्णब गोस्वामी यांनी मांडली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.