बेंगळूरु – इसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या मोड्युलशी संबंधित असल्याच्या दोघा संशयितांना राष्ट्रीय तपास संस्थेने काल अटक केली. स्थानिक तरुणांना भडकावणे आणि इसिसमध्ये भरती होण्यासाठी सीरियात पाठवायला अर्थसहाय्य पुरवण्याच्या कामी हे मोड्युल सक्रिय असल्याचा आरोप आहे.
तामीळनाडूतील रामनाथपुरमचा रहिवासी असलेला अहमद अब्दुल कादर (वय 40) आणि बेंगळूरुजवळील फ्रेझर गावातील रहिवासी असलेला इरफान नासिर (वय 33) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
काही दिवसांपूर्वी ‘एनआयए’ने इसिसच्या मोड्युलशी संबंधित एका डॉक्टरला अटक केली होती. त्यानंतर काही आठवड्यातच ‘एनआयए’ने या दोघांना अटक केली आहे. ‘एनआयए’ने गुराप्पाना पाल्या आणि फ्रेझर गावातील कादर आणि नासिरशी संबंधित ठिकाणांची तपासणीही केली आणि गुन्हेगारी साहित्य आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त केले आहे.
यापैकी कादर हा चेन्नईतील एका बॅंकेत बिजनेस ऍनालिस्ट म्हणून कार्यरत आहे, तर नासिर हा तांदळाचा व्यापारी आहे, असे ‘एनआयए’ने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या दोघांना ‘एनआयए’च्या विशेष न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 10 दिवसांची ‘एनआयए’ची कोठडी देण्यत आली आहे.
इसिसच्या बेंगळूरुमधील मोड्युलचा तपास ‘एनआयए’ने 19 सप्टेंबरला हाती घेतल्यावर काही गुन्हेगारी तथ्य उजेडात आली. बेंगळूरुतील डॉक्टरच्या अटकेने या तपासाला चालना मिळाली. त्याच्या चौकशीदरम्यान 2013-14 दरम्यान सीरियाला गेलेल्या काही जणांची नावे पुढे आली. अधिक तपास केल्यावर कादर, नासिर आणि हिज्ब अल तहरीरच्या अन्य सदस्यांचीही माहिती मिळाली.
या सर्वांनी मिळून ‘कुअआन-सर्कल’नावाने एक गट स्थापन केला होता आणि त्यातून बेंगळूरुतील मुस्लिम युवकांना भडकावले जात असे. तसेच त्यांना सीरियात पाठवण्यासाठी आणि इसिसचे दहशतवादी बनवण्यासाठी अर्थसहाय्यही केले गेले.
सीरियात पाठवले गेलेले दोन तरुण सीरियात मारले गेले आहेत. या संदर्भात व्यापक कारस्थान खणून काढण्यासाठी पुढे तपास सुरू आहे, असे ‘एनआयए’ने म्हटले आहे.