मुंबई – भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई आणि परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात अपमानास्पद वक्तव्य केलं आहे. विशेष म्हणजे कालच महिला दिन झाला असून राज्याच्या सर्वोच्च सभागृहात पडळकरांनी निलम गोऱ्हेंविषयी खालच्या पातळीचं विधान केलं.
पडळकरांनी केलेल्या विधानामुळे विधान परिषदेचे कामकाज बुधवारी दोनदा तहकूब करावे लागले. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत विरोधी सदस्यांनी मांडलेल्या प्रस्तावावर सभागृहात चर्चा सुरू होती त्यावेळी हा गदारोळ उडाला.
पडळकर यांनी देसाई यांचा उल्लेख करताना काही आक्षेपार्ह शेरेबाजी केली. त्यानंतर त्यांनी निलम गोऱ्हेंविषयी विधान केलं. सभापती महोदया तुम्हा शांत बसा. तुमच्या बुडाला जास्त आग लागलेली दिसते, अशी हिन भाषा पडळकरांनी सभागृहात वापरली.
राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांनी पडळकर यांनी माफी मागावी अशी मागणी केली. पण माफी मागण्यास पडळकरांनी नकार दिला. त्यानंतर विधान परिषदेतील अन्यही सदस्यांनी पडळकरांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा जोरदार निषेध केला. त्यामुळे दोनवेळा विधान परिषदेचे कामकाज तहकुब करावे लागले. दरम्यान गदारोळ पाहून, पडळकरांनी अखेर दिलगीरी व्यक्त करत माफी मागितली.