नवी दिल्ली – बागायती कंत्राटदार जितेंद्र यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या महिला कुस्तीपटूला जिल्हा न्यायालयाने 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 2018 मध्ये नोएडाच्या दनकौर येथील झाल्डा गावातील आंब्याच्या बागेत जितेंद्र यांच्या डोक्यात वार करून खून करण्यात आला होता. याप्रकरणी न्यायालयाने दहा वर्षांची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे.
सहाय्यक सरकारी वकील रोहतश शर्मा यांनी सांगितले की, 22 जून 2018 रोजी लाडपुरा गावातील रहिवासी कंत्राटदार जितेंद्र यांचा मृतदेह झाल्डा गावातील जंगलातील ट्यूबवेलच्या होडीत सापडला होता. जास्त मद्यपान केल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. ठेकेदाराच्या भावाने गावात राहणाऱ्या महिला कुस्तीपटू सोनम उर्फ सोनूवर खुनाचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता.
तपासानंतर पोलिसांनी सोनमविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. त्यानुसार हत्येप्रकरणी सोनमला दोषी ठरवले असून न्यायालयाने दहा वर्षाची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे.