ओडेन्स (दि. 19) –भारताची अव्वल बॅडमिंटनपटू व दोन ऑलिम्पिक पदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने येथे सुरू झालेल्या डेन्मार्क ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत विजयी सलामी दिली व स्पर्धात्मक बॅडमिंटनमध्ये थाटात पुनरागमन केले.
सिंधूने पहिल्या फेरीत तुर्कस्तानच्या नेसलीहान यिगीतवर 21-12, 21-10 अशी केवळ 30 मिनिटांत मात केली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर सिंधूने सुदिरामन करंडक तसेच उबर करंडक स्पर्धेतून माघार घेतली होती. डेन्मार्क स्पर्धेद्वारे तिने पुनरागमन केले.
डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सरस कामगिरी केली. पुरुष एकेरीत माजी विजेत्या किदाम्बी श्रीकांत व समीर वर्मा यांनी विजयी सलामी दिली. तसेच पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रांकीरेड्डी व चिराग शेट्टी यांनीही पहिल्या फेरीत विजय मिळवला.
एकेरीच्या सामन्यात श्रीकांतने आपलाच देशबांधव बी. साईप्रणीतचा 21-14, 21-11 असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला व दुसरी फेरी गाठली. समीर वर्माने थायलंडचा 21 वा मानांकित कुन्लावत विटीसर्नवर 21-17, 21-14 अशी मात केली.
दुहेरीच्या गटात रांकीरेड्डी व चिराग जोडीने यजमान डेन्मार्कच्या कॅलम हेमिंग्स व स्टिव्हन स्टॅलवूड या जोडीचा 23-21, 21-15 असा पराभव केला. याच गटात भारताच्या मनु अत्री व बी. सुमित रेड्डी या जोडीला पराभवाचा सामना करावा लागला.