नवी दिल्ली – लखीमपुर खेरीतील शेतकऱ्यांना कार खाली चिरडून मारण्यात आल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेला आशिष मिश्रा यांचे वडिल अजय मिश्रा हे सीमा सुरक्षा दलाच्या एका महत्वाच्या कार्यक्रमाला याच आठवड्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचे अधिकृतपणे आज स्पष्ट झाले आहे.
अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नुकताच शेतकऱ्यांनी देशात अनेक ठिकाणी रेलरोको आंदोलन केले होते. त्यांच्या राजीनाम्याची मागणी सर्वच विरोधी पक्षांकडून करण्यात आली असल्याने ते एक वादग्रस्त मंत्री बनले असतानाही त्यांच्या उपस्थितीत सीमा सुरक्षा दलाच्या शहीद जवानांना मानवंदना देण्याच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे असणार आहेत त्यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्तू केले आहे.
सीमा सुरक्षा दल हे देशातले एक महत्वाचे निमलष्करी दल असून त्यात सुमारे 2 लाख 65 हजार जवान कार्यरत आहेत. देशाची सुमारे 6300 किमीची सीमा रेषा सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी असलेल्या या दलाच्या कार्यक्रमात अजय मिश्रा हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. सीमा दलाचे आजवर 1927 जवान विविध कारवायांमध्ये शहीद झाले आहेत. त्यांना श्रद्धांजली वाहून त्यांना मानवंदना देण्याचा हा कार्यक्रम आहे.
यावेळी मिश्रा यांच्या हस्ते शहीदांच्या परिवाराचा सन्मानही केला जाणार आहे. तसेच त्यांच्या हस्ते शहीद स्मृती स्थळावर पुष्पचक्रही अर्पण केले जाणार आहे असे सीमा सुरक्षा दलाच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.