पुणे – व्हिजन स्पोर्टस् सेंटर आयोजित पहिल्या व्हिजन प्रिमिअर लीग अजिंक्यपद टी-20 क्रिकेट स्पर्धेत शिवराम यादव याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर व्हिजन टायगर्स संघाने व्हिजन लेपर्डस् संघाचा 7 गडी राखून एकतर्फी पराभव करत उद्घाटनाचा दिवस गाजवला.
व्हिजन क्रिकेट अकादमी मैदान, सनसिटी रोड येथे मंगळवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना व्हिजन लेपर्डस् आणि व्हिजन टायगर्स या संघांमध्ये झाला. टायगर्स संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली आणि त्यांच्या गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवला. सामन्याच्या तिसऱ्याच षटकात शिवराम यादव याने व्हिजन लेपर्डस् संघाचे दोन फलंदाजी बाद करून सनसनाटी सुरुवात केली. त्यानंतर ठरावीक अंतराने व्हिजन लेपर्डस् संघाचे फलंदाज बाद होत गेले. लक्ष्मण कटरावत 25 धावा आणि शाम यादव 17 धावा यांनी थोडाफार प्रतिकार केला. व्हिजन लेपर्डस् संघाचा डाव 17.4 षटकात व 94 धावांवर संपुष्टात आला.
टायगर्स संघाचा जलदगती गोलंदाज शिवराम यादव याने 20 धावांत 3 तर, ओंकार चांदगुडे याने 15 धावांत 3 व प्रदीप साळुंकेने 18 धावांत 2 गडी बाद केले. व्हिजन टायगर्स संघाने हे आव्हान 14 षटकात 3 गडी गमावून पूर्ण केले. प्रदीप साळुंके (29 धावा), ओंकार हिंगे (17 धावा), विशाल यादव (नाबाद 15 धावा) व तनिष्क लोमटे (12 धावा) यांनी सरस कामगिरी केली.
या स्पर्धेचे उद्घाटन व्हिजन क्रिकेट अकादमीचे संचालक संतोष मते यांच्या हस्ते झाले. स्पर्धेचे संचालक आणि संयोजक गणेश जोशी यांनी उद्घाटनाचे प्रास्ताविक केले. यावेळी सहभागी खेळाडूंचे पालक आदी उपस्थित होते.
संक्षिप्त धावफलक
गटसाखळी फेरी ः व्हिजन लेपर्डस ः 17.4 षटकात सर्वबाद 94 धावा. (लक्ष्मण कटरावत 25, शाम यादव 17, शिवराम यादव 3-20, ओंकार चांदगुडे 3-15, प्रदीप साळुंके 2-18) पराभूत वि. व्हिजन टायगर्स ः 14 षटकात 3 बाद 95 धावा. (प्रदीप साळुंके 29, ओंकार हिंगे 17, विशाल यादव नाबाद 15, तनिष्क लोमटे 12, शाम यादव 1-24). सामनावीर ः शिवराम यादव.