पुणे – पुनित बालन ग्रुप आयोजित पाचव्या पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग अजिंक्यपद टी-20 क्रिकेट स्पर्धेत ऑक्सिरिच स्मॅशर्स आणि सिम्हा वॉरीयर्स या संघांनी अनुक्रमे कुंतिविमलजी सुपरस्टार्स आणि निंबाळकर रॉयल्स या संघांचा पराभव करून स्पर्धेत आगेकूच केली.
मुंढवा येथील लिजंडस स्पोर्टस् क्लब मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत जाई देवन्नवार हिने केलेल्या नाबाद 69 धावांच्या जोरावर ऑक्सिरिच स्मॅशर्स संघाने कुंतिविमलजी सुपरस्टार्स संघाचा 9 गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना कुंतिविमलजी सुपरस्टार्स संघाने 20 षटकात 2 गडी गमावून 130 धावांचे आव्हान उभे केले. साक्षी वाघमोडे (नाबाद 45) आणि उत्कर्षा पवार (नाबाद 51) यांनी संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभी करून दिली. या दोघींनी तिसऱ्या गड्यासाठी 69 चेंडूत 94 धावांनी नाबाद भागीदारी रचली.
प्रत्युत्तरादाखल ऑक्सिरिच स्मॅशर्सने 19.1 षटकात 1 गडी गमावून 131 धावा केल्या. जाई देवन्नवार हिने 57 चेंडूत 7 चौकारांसह नाबाद 69 धावांची खेळी करून विजयात मोलाचा वाटा उचलला. जाईने मुक्ता मगरे (34 धावा) हिच्या साथीत पहिल्या गड्यासाठी 74 चेंडूत 76 धावांची भागीदारी केली. त्यानंतर जाईने शिवाली शिंदे (नाबाद 18 धावा) हिला बरोबर घेत दुसऱ्या गड्यासाठी 41 चेंडूत नाबाद 54 धावांची भागीदारी करून संघाला अखेरच्या षटकात विजय मिळवून दिला.
दुसऱ्या सामन्यात माया सोनावणे हिच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर सिम्हा वॉरियर्स संघाने निंबाळकर रॉयल्स संघाचा 9 गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना निंबाळकर रॉयल्स संघाने 20 षटकात 7 गडी गमावून 99 धावा केल्या. कर्णधार तेजल हसबनीस (25 धावा) आणि सोनल पाटील (29) या दोघींनी 66 चेंडूत 59 धावांची सलामी देत संघाला उत्तम सुरुवात करून दिली होती. पण तेजल आणि सोनल चुकीचा फटका मारून बाद झाले आणि बिनबाद 59 वरून 62 धावांत 4 गडी बाद असा संघाचा डाव गडगडला.
वैष्णवी माशाळकर हिने 22 धावा करून धावफलकावर संघाच्या 99 धावा लावण्यात मोलाचा वाटा उचलला. सिम्हा वॉरियर्सच्या माया सोनावणे (2-14) आणि उत्कर्षा कदम (2-11) यांनी निंबाळकर संघाच्या डावाला खिंडार पाडले. हे आव्हान सिम्हा वॉरियर्सने 18.2 षटकात व 1 गडी गमावून पूर्ण केले. माया सोनावणे (नाबाद 37 धावा) व सायली लोणकर (नाबाद 36) या दोघींनी जबाबदारीने खेळ करून संघाला सहज विजय मिळवून दिला. या दोघींनी दुसऱ्या गड्यासाठी 49 चेंडूत 56 धावांची अभेद्य भागीदारी करत प्रतिस्पर्धी गोलंदाजांना संधी मिळवून दिली नाही.
संक्षिप्त धावफलक –
1) कुंतिविमलजी सुपरस्टार्स – 20 षटकात 2 बाद 130 धावा (साक्षी वाघमोडे नाबाद 45, उत्कर्षा पवार नाबाद 51, जान्हवी चव्हाण 18) पराभूत वि. ऑक्सिरिच स्मॅशर्स – 19.1 षटकात 1 बाद 131 धावा (मुक्ता मगरे 34, जाई देवन्नवार नाबाद 69, शिवाली शिंदे नाबाद 18) सामन्याची मानकरी – जाई देवन्नवार.
2) निंबाळकर रॉयल्स – 20 षटकात 7 बाद 99 धावा (तेजल हसबनीस 25, सोनल पाटील 29, वैष्णवी माशाळकर 22, माया सोनावणे 2-14, उत्कर्षा कदम 2-11) पराभूत वि. सिम्हा वॉरियर्स – 18.2 षटकात 1 बाद 100 धावा (माया सोनावणे नाबाद 37, सायली लोणकर नाबाद 36). सामन्याचा मानकरी – माया सोनावणे.