लंडन/वेल्स – पुण्यातील मांजरी येथील सिरम इन्स्टिट्युटच्या बीसीजी लसीच्या निर्मिती केंद्रास आग लागून पाच जण मृत्युमुखी पडल्याची घटना ताजी असतानाच, इंग्लंडमधील अस्ट्राझेन्का या ऑक्सफर्डच्या कोव्हिड लस उत्पादन केंद्रास महापूराच्या पाण्याने वेढले आहे. या दैवी योगायोगाची चर्चा समाजमाध्यमांमध्ये सुरु झाली आहे.
इंग्लंडच्या नॉर्थ वेल्स भागातील रेक्सहॅम येथे अस्ट्राझेन्का या ऑक्सफर्डच्या कोव्हिड लसीचे उत्पादन केंद्र आहे. रात्रीच्या सुमारास झालेल्या क्रिस्तोफ या चक्रीवादळामुळे या भागात महापुरासदृश परिस्थिती निर्माण झाली असून लस उत्पादन केंद्रात पाणी शिरले आहे. हवामान विभागाने हिमवर्षावाची सूचना दिली असून तापमान आणखी घसरण्याची शक्यता व्यक्त केली आहे. रात्रीच्या अंधारात मदत कार्यात अडथळे आल्याने बचावकार्य करणाऱ्या आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यकर्त्यांनाही बराच काळ थांबून रहावे लागत होते.
ग्रेटर मॅंचेस्टरच्या इस्ट-वेस्ट डिडजबरी आणि नॉर्थनडेन परिसरातील सुमारे 2000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तसेच नॉर्थ वेल्स भागातील नागरिकांना घरातून बाहेर न पडण्यास सांगण्यात आले आहे. या महापूरसदृश स्थितीमुळे कोविड लस उत्पादन अथवा साठे यावर काही परिणाम झाला आहे की नाही, ते अद्याप समजलेले नाही.
त्यामुळे वातावरण शांत होण्याची प्रतिक्षा केली जात आहे. मदत आणि बचाव कार्याचा वेग वाढवण्यात आला असून, आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे समजते.