घरकामगारांकडून विचारणा; सोसायट्यांकडून मात्र अजूनही थांबण्याचा सल्ला
कात्रज – लॉकडाऊनचे नियम कंटेन्मेंट झोन वगळता शिथिल करण्यात आले आहेत. अशा भागातील दुकाने तसेच दैनंदिन व्यवहार काही ठराविक वेळात सुरू झाले आहेत. कंपन्या, कारखान्यांनाही परवानगी देण्यात आली आहे. असे असताना घरकाम करणाऱ्यांना मात्र अद्यापही घरमालक कामावर बोलावायला तयार नसल्याचे चित्र आहे. आणखी काही दिवस थांबा, असे उत्तर मिळत असल्याचे अशा कामगारांकडून सांगण्यात आले.
लॉकडाऊन मार्च महिन्यापासून जाहीर करण्यात आला आहे. त्याचे तीन टप्पे झाले आता चौथा टप्पाही सुरू होणार आहे. या दरम्यान दुकाने, कंपन्या सुरू झाल्या आहेत. दैनंदिन काही कामे रूळावर येत आहेत. शासकीय कार्यालयेही सुरू झाली आहेत. यातून अनेक कामगार, कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. परंतु, घरकाम करणाऱ्यांना कामावर बोलविण्याची मानसिकता अजूनही घरमालकांत नाही. जे भाग ग्रीन झोनमध्ये आहेत, अशा ठिकाणी घरकाम करण्यास घरकामगार तयार आहेत. पण, घरमालक मात्र अजून काही दिवस थांबा असे सांगत आहेत. तर, काही ठिकाणी सुरक्षिततेचा उपाय म्हणून गृह सोसायट्यांनीच दि. 17 मे पर्यंत गेट बंद करून घेतल्याने अशा ठिकाणी घरकामगारांनाही थांबण्याचा सल्ला दिला गेला आहे.
लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर पहिल्या टप्यात दि. 24 मार्चपासूनच घराघरांतून स्वच्छता कामगार, स्वयंपाक करणाऱ्या महिला, केअर टेकर अशा कामगारांना सुट्टी देण्यात आली. सोसायटीतील प्रत्येक घरातून घरकामगारांना काम थांबवण्यास सांगण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव सर्वांनीच या नियमाचे पालन केले. अशा कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचा पगारही देण्यात आला.
परंतु, आता शहर तसेच उपनगरातील काही भागात लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आल्याने कामावर घेण्याबाबत घरकामगारांकडून आग्रह केला जात आहे. परंतु, लॉकडाऊन दि. 17 मे पर्यंत आहे. तसेच, अजूनही करोनाचा धोका टळलेला नाही. घरकामगार एकपेक्षा अधिक ठिकाणी घरकाम करीत असल्याने यातून संक्रमण वाढण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे घरकामगार सध्या तरी नकोत, अशीच भूमिका अनेक जण घेत आहेत.
बहुतांश घरकामगार महिलांना संबंधित घरांमधून एप्रिल महिन्याचा पूर्ण पगार दिला गेला असल्याने त्या समाधानी आहेत. रेड झोनमधील घरकामगार अजूनही घराबाहेर पडलेले नाहीत. जिथे परिस्थिती निवळली आहे, तिथे घरकामसाठी कामगार तयार आहेत.
– मेधा थत्ते, पदाधिकारी, घरेलू कामगार संघटना