नाशिक – नाशिक जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर वीर यांच्यावर एसीबीने आठ लाखांची लाच स्वीकारल्या प्रकरणी कारवाई केली. मात्र, लाचखोर अधिकारी वैशाली झनकर वीर या न्यायालयात हजर झाल्या नाहीत.
यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाने त्या फरार झाल्या असल्याचे न्यायालयात सांगितले. या प्रकरणी अन्य आरोपी पंकज दशपुते आणि ज्ञानेश्वर येवले यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनाविली आहे.
तक्रारदार यांच्या संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या 20 टक्के अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्याबाबतचा कार्यादेश काढून देण्याकरीता राजेवाडी शाळेचे प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते यांनी 6 जुलै 2021ला शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांच्यासाठी 9 लाख रुपयांच्या लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली.
27 जुलैला तडजोडीअंती 8 लाख रुपये वैशाली झनकर यांनी मान्य केले. शासकीय वाहनचालक ज्ञानेश्वर येवले यांच्यामार्फत ही लाच त्र्यंबकनाका परिसरात स्वीकारत असतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चालक येवलेला रंगेहाथ पकडले. ही कारवाई ठाणे लाचलुचपत विभागाने केली.
रात्री उशिरापर्यंत शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात लाचलुचपत विभागाची चौकशी सुरू होती. करोनाकाळात ग्रामीण भागातील शाळांचे नियोजन आणि इतर महत्वाच्या कामांची वैशाली वीर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली असतानाच हा प्रकार समोर आल्याने नाशिक जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली.