बाळासाहेब कानडे ः एकलहरे येथे 81 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती धनादेशाचे वाटप
मंचर -हुशार आणि होतकरू गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणारी फ्रेंड्स ऑफ चिल्ड्रेन्स, पुणे सेवाभावी संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवून सक्षम नागरिकत्वाच्या जडणघडणीत यशस्वी योगदान देत आहे, असे गौरवोद्गार सानेगुरुजी कथामाला पुणे ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष आणि राज्यपुरस्कार विजेते आदर्श शिक्षक बाळासाहेब कानडे यांनी काढले.
एकलहरे (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद शाळेत फ्रेंड्स ऑफ चिल्ड्रेन्स पुणे या संस्थेच्या वतीने पुणे व अहमदनगर जिल्ह्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या 81 विद्यार्थ्यांना 7 लाख 18 हजार रुपये शिष्यवृत्ती धनादेश वाटप कार्यक्रमात बाळासाहेब कानडे बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने प्रतिमापूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते प्रा. अनंत महाबळेश्वरकर होते.
सामाजिक कार्यकर्त्या मुख्य विश्वस्त वाणी सुब्रमण्यम मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, संस्था प्रज्ञावंत, गरजू मुला-मुलींना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देते. चांगला अभ्यास व सुसंस्कारित वर्तनच आदर्श नागरिकत्व व माणुसकी धर्माच्या जडणघडणीसाठी उपयुक्त ठरेल.शिष्यवृत्ती लाभार्थींना शैक्षणिक वर्षात तीन कार्यशाळा उपस्थिती, वाढती गुणवत्ता, सामाजिक उपक्रमातील सहभाग व उत्तम वर्तनाधारे शिक्षण पूर्ण होईपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते.
यावेळी प्रा. मनोज शर्मा, कार्यालयीन व्यवस्थापक प्रा. स्वाती नाईकनवरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुख्य विश्वस्त वाणी सुब्रमण्यम, मंचर येथील महात्मा गांधी विद्यालयाचे प्रा. एल. डी. उपार, अगस्ती विद्यालय कोतुळचे प्रा. के. डी. आवारी, निगडाळे शाळेचे मुख्याध्यापक संतोष थोरात, प्रा. प्रभाकर बाणखेले आदींच्या हस्ते शिष्यवृत्ती धनादेश प्रदान करण्यात आले. वर्षभरात उत्तम कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्याचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन ज्ञानलक्ष्मी राष्ट्रीय विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मनीषा कानडे, निखिल भागवत, प्रतीक्षा हाडवळे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुजय फलके,सूत्रसंचालन रुपाली भोर, तर शैलेश कोळेकर यांनी आभार मानले.