तुमची-आमची डेक्‍कन क्‍वीन ‘नव्वदी’ची

आरामदायी प्रवासासाठी लवकरच “एलएचबी’ कोचेसचा साज

– कल्याणी फडके

पुणे – पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांची “लाइफलाइन’ असणारी दख्खन एक्‍स्प्रेस अर्थान “दख्खनची राणी’ ब्रिटीशांच्या काळात सुरू करण्यात आली. त्यावेळी ते फक्‍त शनिवार आणि रविवारी धावायची. त्यानंतर आठवड्यातील तीन दिवस धावत होती. तर दि. 26 एप्रिल 1943 पासून ही गाडी दररोज धावते. त्याकाळी “लक्‍झरी गाडी’ म्हणून ओळख असणारी ही “डेक्कन क्वीन’ पुणे-मुंबई असा नियमित प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय झाली आहे. दि.1 जून 1930 मध्ये सुरू केलेली ही एक्‍स्प्रेस “नव्वदी’मध्ये पदार्पण करत आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीश सरकारने केवळ अधिकारी आणि श्रीमंतांना प्रवेशास मुभा दिली होती. सन 1943 नंतर ही गाडी सर्वांसाठी खुली करण्यात आली. त्यानंतर आजतागायत लाखो प्रवाशांनी या गाडीने प्रवास केला आहे. सध्या डेक्कन क्वीन पुणे स्थानकाहून सकाळी 7.15 वाजता सुटते. तर सायंकाळी मुंबईहून 5.10 वाजता पुण्याकडे रवाना होते. सुमारे 1,400 ते 1,500 नागरिक एकावेळी या गाडीतून प्रवास करतात.

सुरुवातील 7 डब्ब्यांच्या असणाऱ्या “डेक्कन क्वीन’ला सध्या 4 एसी चेअर कार, 2 जनरल, 10 द्वितीय श्रेणी चेअरकार आणि 1 डायनिंग कार असे एकूण 17 कोचेस आहेत. प्रवाशांच्या मागणीनंतर 7 डब्ब्यांची एक्‍स्प्रेस 12 डब्ब्यांची करण्यात आली.

“डेक्कन क्वीन’च्या रेकमध्ये 1995 मध्ये बदल करण्यात आले. त्यापैकी जुन्या रेक मधील 5 प्रथम श्रेणीतील चेअर कारऐवजी 5 वातानुकूलित चेअर कार लावण्यात आल्या. पूर्वीच्या डब्ब्यांच्या तुलनेत द्वितीय श्रेणीतील 9 चेअरकारमध्ये 120 अतिरिक्त जागांची व्यवस्था करण्यात आली. या बदलापूर्वी 1,232 आसनांच्या रेक 1,417 आसनांचे झाले. तर कमी किलोमीटरमध्ये डायनिंग कार असणारी भारतातील ही पहिली गाडी आहे. डायनिंग कारमध्ये 32 प्रवासी बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. डेक्कन क्वीनला 2016-17 आणि 2018-19 मध्ये “बेस्ट शॉर्ट डिस्टन्स’ साठी या गाडीला गौरविण्यात आले.

कोच सिस्टीम
सुरुवातीला या गाडीला लाकडी कोच बसविण्यात आले होते. सध्या या गाडीला “आयसीएफ’कोच लावले आहेत. स्टीलपासून तयार करण्यात आलेले हे कोच चेन्नईमध्ये तयार करण्यात येतात. लवकरच या गाडीला “एलएचबी'(लिंक हॉफमन बोस्च) कोच बसविण्यात येणार असून यामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवास अनुभवता येणार आहे.

या आहेत प्रवाशांच्या प्रमुख मागण्या
– डेक्कन क्वीनचे आकर्षण असणारी डायनिंग कार कायमस्वरुपी ठेवावी.
– गाडी वेळेवर यावी आणि वेळेवर धावावी.
– गाडीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोग करुन “चुंबकीय ट्रेन’चा “रेक’ लावावा.
– डेक्कन क्वीन 24 कोचची करण्यात यावी.
– कायमस्वरुपी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 हून गाडी सोडण्यात यावी.

आज केक कापणार
केवळ पुणे-मुंबईच नव्हे तर संपूर्ण जग “डेक्कन क्वीन’च्या प्रेमात आहे. प्रवाशांसाठी ही फक्त रेल्वे नसून अनेकांच्या आठवणी जोडल्या आहेत. “डेक्कन क्वीन’ला स्वातंत्र्यपूर्व काळातील जगातील पहिली बुलेट ट्रेन म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गेली 55 वर्षे दि. 1 जून रोजी थाटात डेक्कन क्वीनचा वाढदिवस साजरा करत आहे, अशी माहिती रेल्वे प्रवासी ग्रूपच्या अध्यक्ष हर्षा शहा, यांनी दिली. दरम्यान, “डेक्कन क्वीन’ बरोबरच “पंजाब मेल एक्‍स्प्रेस’चा शनिवारी 108 वा वाढदिवस पुणे स्थानक परिसरामध्ये साजरा करण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.