राजगुरुनगर (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील ठाकुर पिंपरी गावात कामगार दिनाच्या आदल्या रात्री कामगारांना मारहाण झाली असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या मारहाणीत २ कामगार जखमी झाले आजेत. दरम्यान या घटनेमुळे परप्रांतीय कामगारांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
याबाबत सुत्रांनी दिलेली माहिती अशी कि,ठाकुर पिंपरी (ता खेड ) परिसरात एका कंपनीत परप्रांतीय कामगार काम करीत होते. ते ठाकूर पिंपरी गावातच खोली भाड्याने घेऊन राहत आहेत. लॉकडाऊन मध्ये कंपनी काम बंद झाल्याने ते ठाकूर पिंपरीत राहत आहेत.
गुरुवारी ( दि ३० ) मध्यरात्रीच्या सुमारास गावातील काही मद्यधुंद अवस्थेत असलेल्या अज्ञात व्यक्तींनी प्रांतीय कामगार राहत असलेल्या ठिकाणी जाऊन ३ कामगारांना हातात लाकडी दांडके, लोखंडी रॉड घेऊन बेदम मारहाण केली. त्यामध्ये काही जणांच्या हाताला पायाला जखमा झाल्या आहेत. कामगारांच्या राहत्या खोलीच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या. त्यामुळे घटना घडल्यानंतर रात्रभर हे कामगार भितीच्या वातावरणात घरातच बसले होते.
आज दि.२ रोजी सकाळी खोली सोडून आपआपले साहित्य घेऊन येथे वास्तव्यास असलेले सुमारे ३० ते ३५ परप्रांतीय कामगार आडवाटेने त्यांच्या मुळगावाच्या दिशेने निघाले होते. पुणे -नाशिक महामार्गावर येताच खेड पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता. त्यांनी घडलेला प्रकार सांगितला. तसेच आम्ही जर पुन्हा जर या गावात गेलो तर आम्हाला मारहाण होईल, आम्ही जाणार नाही असा प्रवित्रा कामगारांनी घेतला.
मात्र खेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक अरविंद चौधरी, सहाय्यक पोलिस निरिक्षक निलेश बडाख, गोपीनीय विभागाचे संदिप भापकर यांनी त्यांची समजुत काढून दिलासा देऊन पुन्हा माघारी पाठविले आहे.मारहाण करणाऱ्या टोळक्यांमधील दोन नांवे कामगारांनी पोलिसांना सांगितली असुन त्यांची सखोल चौकशी करून ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे अश्वासन पोलिसांनी येथील परप्रांतीय कामगारांना दिले आहे