गुजरातमध्ये 313 कोटी रूपयांचे ड्रग्ज जप्त

पाकिस्तानातून सागरी मार्गे पाठवण्यात आला साठा

अहमदाबाद – गुजरातमध्ये मागील दोन दिवसांत तब्बल 313 कोटी रूपये किमतीचा अंमली पदार्थांचा (ड्रग्ज) साठा जप्त करण्यात आला. त्या कारवाईवेळी पोलिसांनी तिघांना अटक केली. हस्तगत करण्यात आलेला ड्रग्ज साठा पाकिस्तानातून सागरी मार्गे पाठवण्यात आल्याचे उघड झाले.

गुजरात पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे मंगळवारी द्वारका जिल्ह्यात कारवाई केली. खंभालियातील विश्रामगृहावर छापा टाकून पोलिसांनी 88 कोटी रूपयांचे हेरॉईन आणि मेथाम्फेटामाईन जप्त केले. तो साठा बाळगणाऱ्या सज्जाद घोसी याला अटक करण्यात आली. तो महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्याचा रहिवासी आहे. भाजी विक्रेता असणारा सज्जाद ड्रग्ज साठा ताब्यात घेण्यासाठी काही दिवसांपूर्वी खंभालियात आला होता. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सलीम आणि अली कारा या भावांना अटक केली. त्यांच्याकडे 225 कोटी रूपयांचे हेरॉईन सापडले.

याआधी सप्टेंबरमध्ये गुजरातच्या मुंद्रा बंदरावर तब्बल 21 हजार कोटी रूपयांचा प्रचंड ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला. त्या घडामोडीचे राजकीय पडसाद उमटून विरोधी पक्षांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली. त्या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.