नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी देश-विदेशातून आलेल्या पाहुण्यांसाठी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी काल रात्री राष्ट्रपती भवनात मेजवानीचे आयोजन केले होते. या समारंभाला बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद अब्दुल हमीद, श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाला सिरीसेना, किर्गिस्तानचे राष्ट्रपती सोरोनबे जिनबेकोव्ह, म्यानमारचे राष्ट्रपती यु विन मिन्ट, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ, नेपाळचे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली, भुतानचे पंतप्रधान डॉ. लोते त्सेरिंग, थायलंडच्या पंतप्रधानांचे विशेष दूत ग्रिस्डा बुनरॅच हे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रपतींनी उपस्थित मान्यवरांशी संवाद साधला. भारताची स्वप्न केवळ भारतापुरती मर्यादित नाहीत, जेव्हा आम्ही आमच्या प्रगतीसाठी काम करतो, त्याचवेळी आम्हाला सहकार्य करणाऱ्या सर्व शेजारी देशांचाही आम्ही विचार करत असतो. हिंद महासागरापासून बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेल्या या मध्यआशियाई प्रदेशातल्या सर्व राष्ट्रांमध्ये सांस्कृतिक बंध आहेत आणि आपल्या आर्थिक संधीही समान आहेत. या सर्व देशांच्या आशा, आकांक्षा सारख्याच आहेत. अनेक शतकांपासून मध्य आशियातील व्यापार व्यवस्थेचा केंद्र बिंदू भारत राहिला आहे. हा आमचा वारसाही आहेच आणि आमचे भविष्यही आहे. आपल्या सर्व देशांमधल्या जनतेसाठी तसेच एकूणच जागतिक समुदायासाठी या प्रदेशात शांतता आणि समृद्धी नांदावी यासाठी आपण एकत्र काम करणे गरजेचे आहे. एकमेकांच्या प्रगती आणि कल्याणामधेच सर्वांचे हित सामावलेले आहे, असे राष्ट्रपती म्हणाले.
विदेशी पाहुण्यांबरोबर मोदींची चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला सन्माननीय पाहुणे म्हणून किर्गिस्तानचे राष्ट्राध्यक्ष सोरोनबे सारीपोविच जिनबेकोव्ह उपस्थित होते. शांघाय सहकार्य संघटनेचे अध्यक्ष पद सध्या किर्गिस्तानकडे असून, दक्षिण आशियातला किर्गिस्तान हा भारताचा महत्वाचा भागिदार आहे. किर्गिस्तानचे राष्ट्राध्यक्ष सोरोनबे सारीपोविच जिनबेकोव्ह यांनी पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या तसेच 13 ते 15 जून 2019 दरम्यान होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले.
भारत आणि किर्गिस्तान यांच्यात स्नेहपूर्ण संबंध असून, गेल्या काही वर्षात द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केले. शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल मोदी यांनी जिनबेकोव्ह यांचे आभार मानत आपण लवकरच किर्गिस्तानला भेट देऊ असे आश्वासन दिले.
पंतप्रधान मोदी आणि सिरीसेना यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय बैठक झाली. नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमधे मोदी आणि त्यांच्या पक्षाने मिळवलेल्या अभूतपूर्व यशानंतर पुन्हा पंतप्रधान पदाचा कार्यभार ग्रहण केल्याबद्दल सिरीसेना यांनी मोदी यांचे अभिनंदन केले. दोन्ही देशांमध्ये शांतता, समृद्धी आणि आशियाई प्रदेशात सुरक्षितता निर्माण व्हावी, यासाठी एकत्रित काम करण्याची कटिबद्धता उभय नेत्यांनी व्यक्त केली.
शपथविधी समारंभात सहभागी होण्यासाठी आलेले मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांच्याशी आज पंतप्रधान मोदी यांनी चर्चा केली. या द्विपक्षीय बैठकीत जगन्नाथ यांनी लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मोठ्या बहुमताने निवडून आल्याबद्दल मोदी यांचे अभिनंदन केले. मोदी यांनी जगन्नाथ यांचे आभार मानले तसेच दोन्ही देशातले संबंध अधिक दृढ करण्यासाठीची कटिबद्धता व्यक्त केली. दोन्ही देशांची सुरक्षितता तसेच विकासासाठी आणि हिंदी महासागर प्रदेशाच्या प्रगतीसाठी एकत्र काम करण्याबद्दल दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.