संविधान दिनी संविधानासंदर्भातील विशेष प्रदर्शनाचे आयोजन

केवडिया – संविधान दिनाच्या निमित्ताने गुजरातमधील केवडिया इथे राज्यघटनेबाबतच्या एका विशेष मल्टीमिडीया प्रदर्शनाचे आयोजन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्यावतीने आयोजित करण्यात आले होते. पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेच्या निमित्ताने उपस्थित झालेले राज्यांच्या विधीमंडळांचे सभापती, खासदार, संसद सदस्य आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन प्रदर्शनाचे कौतुक केले.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत “ब्युरो ऑफ आउटरीच कम्युनिकेशन’ने “पर्लियामेंटरी म्युझियम ऍन्ड अर्काईव्हज’च्या सहयोगाने हे प्रदर्शन आयोजित केले होते. केवडीया येथील “स्टॅच्यू ऑफ युनिटी’जवळ आयोजित केल्या गेलेल्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या 80 व्या अखिल भारतीय परिषदेचा भाग म्हणून आयोजित केलेल्या या प्रदर्शनाचे उद्‌घाटन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते बुधवारी झाले.

या प्रदर्शनामध्ये वैदिक काळापासून ते सर्वात अलिकडील लिछवी प्रजासत्ताकापर्यंत भारतीय लोकशाहीच्या संस्कृतीचा आणि आधुनिक भारताच्या निर्मितीतील प्रवास दर्शवण्यात आला होता.

1,600 चौरस फूटांच्या भव्य दालनामध्ये प्लाझ्मा डिस्प्ले, इंटरॅक्‍टीव्ह डिजीटल प्लिप बुक, आरएफआयडी कार्ड रिडर, इंटरॅक्‍टीव्ह स्क्रीन, डिजीटल टच वॉल इत्यादीच्या माध्यमातून लोकशाहीबाबतच्या माहितीचे सादरीकरण केले गेले होते. संविधान मसुदा समितीतील सदस्य डॉ. आंबेडकर, डॉ. राजेंद्र प्रसाद, पंडीत जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, शामाप्रसाद मुखर्जी आदींसह महत्वाच्या नेत्यांची भाषणांचे अंश यामध्ये होते.

राज्यघटनेचा वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमधील सरनामाही येथे उपलब्ध केला गेला होता. विविध राष्ट्रीय चिन्हे, मानके आणि राज्यघटनेच्या संदर्भातील घटनाक्रमही डिजीटल माध्यमातून सादर करण्यात आला होता.

लोकशाहीबाबतचा घटनाक्रम प्रभावी पद्धतीने मांडला गेला असून लोकशाहीबाबत जनजागृती करण्यासाठी हे प्रदर्शन देशाच्या विविध भागांमध्ये आयोजित केले जावे, अशी अपेक्षा लोकसभेच्या सभापतींनी यावेळी व्यक्‍त केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.