मुंबई – अरबी समुद्रामध्ये कोसळलेल्या नौदलाच्या मिग-29 के या विमानाचे बेपत्ता झालेले वैमानिक कमांडर निशांत सिंग यांचा शोधासाठी सुरू केलेली मोहिम अजूनही सुरू आहे, असे नौदलाचे पाश्चिम विभागाच्या प्रवक्त्याने आज सांगितले. हवेतून आणि पाण्याच्या पृष्ठभागावरूनही आणखी काही व्यवस्थांच्या माध्यमातून हा शोध घेतला जात आहे, असे प्रवक्त्याने सांगितले.
रशियन बनावटीचे मिग-29 के या प्रशिक्षणासाठीच्या विमानाने गुरुवारी संध्याकाळी “आयएनएस’ विक्रमादित्यवरून उड्डाण केले होते. संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ते अरबी समुद्रामध्ये कोसळले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
विमान कोसळल्यानंतर एका वैमानिकाला वाचवण्यात यश आले. तर कमांडर निशांत सिंग यांच्या शोधासाठी शोधमोहिम सुरू करण्यात आली असल्याचे नौदलाच्या प्रवक्त्याने कालच सांगितले होते. विमान कोसळण्याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. त्याची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरिय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.