पुणे – दर दोन मिनिटाला प्रत्यारोपणासाठी अवयव न मिळाल्याने मृत्यूशयेवरील रुग्णांचे निधन होते. रस्त्यावरील अपघातात दरवर्षी निधन पावणाऱ्या दीड लाख व्यक्तींचे अवयवदान जागृतीने अवयव दात्यात रुपांतर करता आले, तर प्रत्येक रुग्णाला जीवनदायी अवयव मिळेल. त्यासाठीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत विद्यार्थ्यांना अवयवदान जागृतीचे ऑनलाइन प्रशिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना, इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य व व्हीफाॅर ऑर्गन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील स्वयंसेवक व अन्य विद्यार्थ्यांना प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यात आले आहे. प्रशिक्षण आठ प्रकरणात विभागले असून, प्रशिक्षण सामुग्री साॅफ्ट काॅपी स्वरुपात तयार आहे. विद्यार्थ्यांना आपल्या मोबाइलचा वापर करुन सोयीच्या वेळेत व सोयीच्या ठिकाणी अभ्यास करुन हे प्रशिक्षण २६ जानेवारीपूर्वी पूर्ण करावयाचे आहे.
प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असून, ते पूर्ण झाल्यावर प्रत्येकाला इ-सर्टिफिकेट दिले जाणार आहे. ज्या महाविद्यालयाचे सर्वाधिक प्रशिक्षण पूर्ण करतील, अशा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन सन्मान दिला जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डाॅ. सदानंद भोसले यांनी दिली. प्रशिक्षणासाठी नोंदणी आवश्यक असून त्यासाठी गुगल फार्मची लिंक विद्यापीठाच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. या प्रशिक्षणासाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी करावे, असे आवाहन भोसले यांनी केले आहे.