वॉशिंग्टन – अमेरिकेत करोना प्रसाराचा विस्फोट झाल्याचे लक्षात आल्यानंतर आता तेथे युद्धजन्य उपाययोजनां सुरू झाल्या असून अमेरिकेच्या अध्यक्षांनी डिफेन्स प्रॉडक्शन कायद्याचा आधार घेत त्या देशातील जनरल मोटर्स या जगद्विख्यात मोटार कार बनवणाऱ्या कंपनीला व्हेंटिलेटर्स बनवण्याचा आदेश दिला आहे. करोना प्रसाराची स्थिती लक्षात घेऊन ही उपायोजना केली गेली आहे.
या व्हेंटिलेटर्सच्या किंमती निश्चित करण्यासाठी वेळ जाण्याची शक्यता लक्षात घेऊन हा विषय मार्गी लावण्याच्या आधीच जनरल मोटर्स या कंपनीत व्हेंटिलेटर्सच्या उत्पादनाची प्रक्रिया सुरू करण्यास संबंधित कंपनीला सांगण्यात आले आहे. जनरल मोटर्स ही कंपनी सुरुवातीला टाळाटाळ किंवा वेळकाढूपणा करीत होती पण त्यांनाही डिफेन्स प्रॉडक्शन कायद्याचा बडगा दाखवण्यात आल्याने त्यांनी हे काम हातात घेण्यास तयारी दाखवली आहे असे सांगण्यात येत आहे.
करोनाग्रस्तांसाठी हजारो व्हेंटिलेटर्स लागणार आहेत. करोनामुळे अमेरिकेत मरण पावलेल्यांची संख्या पंधराशेवर गेली असली तरी अजून अडीच हजार पेशंट अत्यवस्थ अवस्थेत असल्याने हा आकडा वाढण्याचा धोका आहे. एकट्या न्युयॉर्क शहरात करोनाचे 45 हजार रुग्ण आहेत. त्यामुळे तेथे हजारो व्हेंटिलेटर्स गरजेचे असल्याने प्रशासनाची त्यासाठी धावाधाव सुरू आहे.