पुणे -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा 14 एप्रिलपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षा मार्चच्या शेवटच्या टप्प्यात सुरू होत्या. महाराष्ट्रात “करोना’चा प्रभाव वाढत असल्याने शाळा, महाविद्यालय, विद्यापीठांना सुट्टी जाहीर करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना वसतीगृह सोडण्याचे आदेश देण्यात आले. विद्यार्थी गावाकडे गेले आहेत.
विद्यापीठाने 31 मार्च पर्यंतच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. 14 एप्रिलपर्यंत संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. मात्र, विद्यापीठाकडून परीक्षेसंबंधी भूमिका जाहीर केली नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. अखेर विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात पुणे, नाशिक, नगर जिल्ह्यातील संलग्न महाविद्यालयांना हा निर्णय कळवण्यात आला आहे. 14 एप्रिलनंतर शासनाच्या आदेशानुसार पुढील माहिती कळविण्यात येईल, असे पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी सांगितले.