पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्यातील मराठवाडा आणि विदर्भालगत आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पुढील तीन दिवसविजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. विदर्भातील अमरावती, भंडारा, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत आज मेघगर्जनेसह पाऊस झाला. पुढील तीन दिवस विदर्भातील बहुतांश भागात हलका ते जोरदार पाऊस पडेल. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागात पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
गोंदिया, भंडारा, नागपूर, अमरावती, वर्धा, गडचिरोली जिल्ह्यांत मेघगर्जनेसह गारपीट होईल. मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात लातूर, नांदेडमध्ये हलका पाऊस पडेल. राज्यात आज (दि. 17) सोलापूर येथे सर्वाधिक 39.8 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. 19 मार्चनंतर हवामानात बदल होणार असल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले.
पुणे शहरातील हवामान कोरडे
पुणे शहरासह जिल्ह्यातील हवामान कोरडे असून, दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री गारवा अशी परिस्थिती आहे. पुढील दोन दिवस आकाश निरभ्र राहील. तर दि. 19 मार्च रोजी आकाशा अधून-मधून ढगाळ राहील. त्यामुळे किमान व कमाल तापमानात किंचीत घट होईल.
दि. 21 मार्चनंतर शहरासह जिल्ह्यातील कमाल व किमान तापमानात वाढ होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. दरम्यान, रविवारी शहरातील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले, तर लवळे येथे सर्वाधिक 38.2 आणि मगरपट्टा येथे 37.4 कमाल तापमानाची नोंद झाली.