मुंबई – शनिवारी रात्री उशीरा केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवले. त्यानंतर आयोगाने सोमवारी दुपारी 1 वाजेपर्यंत पक्षाच्या नावासाठी आणि चिन्हांसाठी पर्यायी नावे सुचवण्याचे शिवसेनेच्या दोन्ही गटांना सांगितले होते. त्यानुसार, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून आयोगाकडे नावांचे पर्याय देण्यात आले आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून नावे सादर करण्यात आली आहेत. शिवसेना बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना बाळासाहेबांची अशी तीन नावे पर्याय म्हणून आयोगाकडे देण्यात आली आहेत. यातील पहिले नाव म्हणजे शिवसेना बाळासाहेब ठाकरे हे नाव उद्धव ठाकरे यांच्या गटाकडूनही देण्यात आले आहे. ठाकरे गटाकडून शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी नावे सादर करण्यात आली आहेत.
दोन्ही गटांनी चिन्हांसाठीही नावे सुचवली आहेत. त्रिशुळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल हा पर्याय ठाकरे गटाकडून दिला आहे. तर शिंदे गटाकडून उगवता सूर्य , त्रिशुळ आणि गदा या चिन्हांचा पर्याय दिला आहे. दरम्यान, निवडणूक आयोग आता यासंदर्भात काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.