इंदूर – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नक्कीच देशाच्या नेत्या आहेत. पण, विरोधकांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) ठरवेल, अशी भूमिका मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कमल नाथ यांनी बुधवारी मांडली.
बंगालमध्ये विजयाची हॅट्ट्रिक नोंदवत ममता पुन्हा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्या.
त्यापार्श्वभूमीवर, पुढील लोकसभा निवडणुकीत विरोधकांचा चेहरा म्हणून ममतांचे नाव पुढे केले जाणार का, असा प्रश्न पत्रकारांनी नाथ यांना विचारला. त्यावर ते उत्तरले, पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत आताच काही सांगता येणार नाही. त्याविषयीचा निर्णय कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए योग्य वेळी घेईल. ममता सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनल्या आहेत.
बंगालमधील अभूतपूर्व निवडणुकीत कडवी लढत देऊन त्यांनी आताचा पल्ला गाठला आहे. त्यांना केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच सीबीआय, ईडी आणि प्राप्तिकर खात्याशीही लढावे लागले, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. ममतांचे अभिनंदन करण्यासाठी मी त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यांना मध्यप्रदेश भेटीचे निमंत्रण मी दिले आहे, असेही नाथ यांनी सांगितले.