MLA Pratibha Dhanorkar – पक्षांतर्गत विरोधामुळेच माझे पती खासदार बाळू धानोरकर यांचा जीव गेला, असा खळबळजनक आरोप आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केला आहे. तर त्यांचा जीव घेतला आता ते माझ्या मागे लागले आहेत, असा आरोप त्यांनी काँग्रेस नेत्यावर केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. चंद्रपुरात एका कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या की, विरोधामुळे एक जीव गेला आता दुसरा जीव जाणार नाही, याची काळजी मी घेईन, असेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे.
प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, माझ्यावर आरोप करणारे नेते स्वतः भाजपमध्ये जाणार आहेत. माझ्याबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत. मी कुठेही जाणार नसून काँग्रेसच्याच तिकिटावर लोकसभा लढवणार आहे, असे म्हणत भाजप प्रवेशाच्या चर्चांना धानोरकर यांनी पूर्णविराम दिला आहे.
चंद्रपूर येथून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेस प्रभारी चेंनिथला यांच्यासोबत मतदारसंघाबाबत चर्चा करण्यात आली, मात्र त्यांनी कुठलेच आश्वासन दिले नाही. काँग्रेसमध्ये वेळेपर्यंत कुठला निर्णय होत नाही. मला कुठले निर्देश नसले तरी माझी तयारी सुरू आहे.
मला लोकसभा निवडणूक लढवायची आहे, तिकीट मागण्याचा प्रत्येकाला अधिकार असून शिवानी वडेट्टीवार काही माझी प्रतिस्पर्धी नाही. कोणी दिल्लीला शिष्टमंडळ नेल्याने तिकीट मिळत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.