शिवसेना उपनेते ना. नितीन बानुगडे-पाटील यांची उंब्रजला पत्रकार परिषदेत माहिती
उंब्रज – कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात नव्या कोऱ्या चेहऱ्यालाच संधी दिली जाईल. वारंवार पक्ष बदल करणाऱ्या उमेदवाराला संधी देणार नाही. कराड उत्तरसह जिल्ह्यातील सहा मतदारसंघ शिवसेना पूर्ण ताकतीने लढवणार असून कराड उत्तर, माण-खटाव, वाई, पाटण, फलटण, कोरेगाव हे मतदारसंघ सेना जिंकण्यासाठी लढणार आहे. त्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे असे आवाहन शिवसेनेचे उपनेते सातारा-सांगली जिल्हा संपर्कप्रमुख नितीन बानुगडे पाटील यांनी उंब्रज येथे पत्रकार परिषदेत बोलताना केले.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सुनील पाटील, किरण भोसले, उपतालुका प्रमुख संजय भोसले, उपतालुकाप्रमुख दत्तात्रय पवार, देवदत्त माने, रविभाऊ सूर्यवंशी, सुभाष थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. उंब्रज ता. कराड येथे नुकत्याच पार पडलेल्या भाजप मेळाव्यात जिल्हयातील चार मतदार संघातील उमेदवारांची नावे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहिर केल्याने शिवसेना कार्यकर्ते संभ्रमवास्थेत होते. ते दूर करण्यासाठी ना. बानुगडे पाटील यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली. ते म्हणाले, कराड उत्तरमधून मनोज घोरपडे यांना युतीत शिवसेनेच्या वाटणीला गेलेल्या मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारांची घोषणा केल्याने सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली. तसेच साताऱ्याचे शिवेंद्रसिंहराजे भोसले तर माण-खटावमधून जयकुमार गोरे हे भाजपमध्ये डेरेदाखल झाले आहेत.
याचा अर्थ आठपैकी सहा ठिकाणी उमेदवारी नक्की असेल तर शिवसेनेचे काय यावरून शिवसैनिक हवालदिल झाले होते. शिवसेना कार्यकर्त्यांची संभ्रमवास्था दूर करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. कराड उत्तरसह जिल्ह्यातील सहा मतदारसंघ शिवसेना पूर्ण ताकतीने लढवणार असून कराड उत्तर, माण-खटाव, वाई, पाटण, फलटण, कोरेगाव हे मतदारसंघ सेना जिंकण्यासाठी लढणार असल्याचे ते म्हणाले. हणबरवाडी-धनगरवाडी योजना व इंदोली आणि पाल उपसा सिंचन योजना याबाबत शासनाची आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. या योजनेवर शासनाने भरपूर निधी टाकला असून आता निधी वाचून कोणतेही काम रखडले नाही याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले. काही न काही कारणाने या योजना रडतखडत चालू होत्या. मात्र कृष्णा खोरेचे उपाध्यक्षपद मिळाल्यापासून धनगरवाडी हा माझा ड्रीम प्रोजेक्ट पूर्णत्वास नेण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेना कराड उत्तरमधील तसेच जिल्ह्यातील कृष्णा खोरेचे सर्व प्रकल्प पूर्णत्वास नेणार आहे. कराड उत्तर व जिल्ह्यातील शिवसेनेच्या वाट्याचे विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचे आहेत. आणि या जागेवर शिवसेनेचे निष्ठावंत उमेदवार उभे राहतील. जिल्ह्यातील सेनेचे उमेदवार लढण्यासाठी उभारणार नाही तर जिंकण्यासाठी उभे राहतील. त्यामुळे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना कोणत्याही परिस्थितीत कोणालाही सोडणार नाही. लोकांना परिवर्तन पाहिजे आणि त्याची सुरुवात आता झालेली आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे शिवसैनिकांनी मनात कोणताही किंतु परंतु न बाळगता विधानसभेच्या तयारीला लागण्यासाठी आम्ही पक्षीय पातळीवर आदेश दिले आहेत. त्याबरोबरच पूर्ण सातारा जिल्ह्याचा आढावा घेऊन उमेदवाराबाबत चाचणी केली असून याबाबतचा अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
सातारा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना जवळपास साडेचार लाख मते मिळाली. विजयासाठी थोडेफार मते कमी पडली.
परंतु शिवसेनेने दिलेल्या लढतीचे उभ्या महाराष्ट्रात कौतुक होत आहे. या लढतीवेळी आमच्या काही उणिवा राहिल्या त्याचे आम्ही आत्मपरीक्षण केले असून, जिथे कुठे कमतरता राहिली असेल ती पूर्ण करणार आहे. जिल्ह्यात शिवसेना सक्षम झाली असून येणारी विधानसभा निवडणूक ही युतीच्या माध्यमातूनच लढवली जाईल. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील चर्चेनुसार महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकीला भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष युतीच्या माध्यमातून सामोरे जाणार आहेत. जागावाटपाचा फॉर्मुला ठरला असून त्याबाबत पक्षश्रेष्ठी यांनी खुलासा केला आहे.