वाहन विक्री करणाऱ्या वितरकांची खंत : ग्राहकांचे जीएसटी कपातीकडे लक्ष
पुणे – आर्थिक मंदी, अपुरा कर्जपुरवठा आणि सरकारच्या संदीग्ध धोरणामुळे वाहन वितरक गुंतागुंतीच्या परिस्थितीत सापडले आहेत. बरेच ग्राहक फोनवर आणि प्रत्यक्ष वाहनांची चौकशी करतात मात्र, खरेदी पुढे ढकलतात असा अनुभव येत असल्याचे दिसून येते.
वाहन विक्रेत्यांची संघटना असलेल्या एफएडीएचे पदाधिकारी आशिष काळे यांनी सांगितले की, सरकारने वाहन वितरकांना आणि खरेदी करणाऱ्यांना कर्जपुरवठा करण्याबाबत काही उपाययोजना जाहीर केल्या आहेत. मात्र, ग्राहक सावध आहेत. एकूण परिस्थिती पाहता वाहनावरील जीएसटी 28% वरून 18% होण्याची शक्यता आहे. सरकार लवकर निर्णय घेत नसल्यामुळे ग्राहक 10 टक्के जीएसटी जास्त देऊन आता वाहन खरेदी करण्यापेक्षा जीएसटी कमी झाल्यावर वाहन खरेदी करू, असे मत व्यक्त करीत आहेत.
गेल्या वर्षी उत्सवाच्या काळातही वाहन विक्री कमी झाली होती. मात्र, यावर्षी एक तर वाहन विक्री स्थिर राहण्याची किंवा थोडीफार वाढण्याची शक्यता असल्याचे काळे यांना वाटते. लवकरच बीएस-6 उत्सर्जन मानदंड लागू होणार आहे. त्यामुळे सध्याच्या बीएस-4 वरील वाहनांचे काय होणार हा प्रश्न होता. बीएस-4 वाहने रद्द केली जाणार नाहीत, असे सरकारने सांगितल्यानंतर याबाबतचा संभ्रम कमी झाला आहे.
मात्र, जीएसटीबाबतचा निर्णय जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत ग्राहक खरेदीसाठी पुढे येणार नाहीत. 20 दिवसांनंतर जर जीएसटी कमी झाला तर आपण आता का खरेदी करावी, अशी शंका ग्राहकांना येणे रास्त आहे.
परिस्थिती पूर्ववत होण्यास वेळ लागणार
एनबीएफसी आणि इतर वित्तपुरवठा करणाऱ्या संस्था गेल्या 5 महिन्यांपासून वितरकांकडे फिरकत नव्हत्या. मात्र, गेल्या आठवड्यात अर्थ मंत्रालयाने केलेल्या काही घोषणांनंतर या संस्थांचे काही अधिकारी परिस्थितीची चाचपणी करण्यास येऊ लागले आहेत. मात्र, ते फार आग्रही असल्याचे दिसत नाही. त्यामुळे या क्षेत्रातील परिस्थिती पूर्ववत होण्यास बराचकाळ लागू शकतो, असे काळे यांनी सांगितले.