खडकी येथील सभेत आ. मकरंद पाटील यांची चौफेर फटकेबाजी; निवडून येण्याची खात्री
भुईंज – माझ्या आजारपणाची विरोधकांनी काळजी करू नये. दवाखान्यात झोपून असताना निवडणूक लढविली तरी निवडून येईन, एवढी मतदारांबाबत खात्री आहे, असे सांगत आ. मकरंद पाटील यांनी विरोधकांवर चौफेर फटकेबाजी केली. खडकी, ता. वाई येथे नुकत्याच झालेल्या सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, 1 तारखेपासून कालपर्यंत माझी तब्बेत बरी नव्हती. त्यामुळे इच्छा असतानाही तीन गावांचा अपवाद वगळता मला कार्यक्रमांना उपस्थित राहता आले नाही.डॉक्टरांनी मला सक्तीची विश्रांती घ्यायला सांगितले होते.
मी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना आमदार आता निवडणूक लढवत नाही, अशी चर्चा विरोधकांनी रंगवली होती. मात्र, माझ्या मतदारसंघातील जनतेबद्दल एवढी खात्री आहे की, दवाखान्यात झोपून असतानाही मी निवडून येईन. भौगोलिक आणि लोकसंख्येच्या दृष्टीने मोठ्या असलेल्या मतदारसंघाचे प्रलंबित प्रश्न जनतेच्या आशीर्वादाने मार्गी लावण्याचे प्रयत्न दहा वर्षांत केले आहेत. कवठे-केंजळ योजना, चिंधवलीचा पूल, अशी असंख्य कामे पूर्ण केली आहेत.
वाई येथे न्यायालयासमोर छत्रपती शिवरायांच्या भव्य स्मारकाचे काम सुरू आहे. महाबळेश्वर, खंडाळा तालुक्यांचे प्रश्न, देवघर, बलकवडीचे पाणी वाघोशी गावापर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झालो आहे. विरोधक काल परवा भाजपमध्ये गेले असून एक-दोन कामे सोडली तर त्यांनी एकही काम मंजूर करून आणले नाही; परंतु मुख्यमंत्र्यांना कामाचं पत्र दिलं की, काढ फोटो, आण बातमी, मंत्र्याला निवेदन दिलं की, काढ फोटो, आण बातमी, असा प्रकार सुरू आहे.
ज्यांना शरद पवारसाहेबांनी आमदार, खासदार केले; एका एका घरात तीन तीन पदे दिली, तीच मंडळी स्वार्थासाठी साहेबांना सोडून गेल्याचे वाईट वाटते. केंद्रात कृषिमंत्री असताना पवारसाहेबांनी कर्जमाफी देऊन संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचे सातबारा कोरे केले होते.
अलीकडेच कराड, सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी 79 व्या वर्षी पवारसाहेब तांबवे, सांगली, कोल्हापूर येथे फिरत होते. विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी कोट्यवधी रुपयांची मदत पूरग्रस्तांना केली, असे आ. पाटील म्हणाले. सभेस सरपंच सरोज शिंगटे, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रतापराव पवार, पंचायत समितीच्या सभापती रजनी भोसले, माजी सभापती प्रमोद शिंदे, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, माजी सदस्य दिलीप बाबर, उदयसिह पिसाळ,मार्केट कमिटीचे उपाध्यक्ष दीपक बाबर, सुरेश बाबर, जिल्हा खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष कांतिलाल पवार, माजी उपसभापती मदन भोसले, महादेव म्हसकर, प्रकाश पावशे, सुधीर भोसले उपस्थित होते.
“गॉगलवाल्याची’ अजिबात चिंता नाही
निवडणूक जवळ आल्याने मतांचा जोगवा मागण्यासाठी विरोधक दारोदार फिरत आहेत. मात्र, मला त्या “गॉगलवाल्याची’ अजिबात चिंता नाही, असे आ. पाटील म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.