नेत्रविकार आणि आयुर्वेद

दृष्टी उत्तम असेल, तर सृष्टीसौंदर्याचा आनंद घेता येतो. पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश यापासून दृष्टी संघटित झाली आहे. मात्र, त्यात बाधा आल्यास जीवन अंधकारमय होऊ शकते. दृष्टीला बाधा आणणाऱ्या घटकांचे आयुर्वेदाने विवरण करून त्यासाठी काही पथ्य व चिकित्सा आपण पाहूया…

नेत्र हा अवयव प्रामुख्याने तेज या महाभुताने संघटित असून, नेत्राच्या विविध क्रियांचे वात, पित्त, कफ या दोषांद्वारे नियमन केले जाते. डोळे जळजळणे, लाल होणे, उष्ण अश्रुस्राव होणे ही पित्ताची लक्षणे आहेत. डोळे चुरचुरणे, खुपणे, कोरडेपणा येणे, सततचा वाढता नंबर, पापण्या उघडझाप करण्यास त्रास होणे ही वाताची लक्षणे आहेत. तर डोळ्यांना खाज येणे, चिकट स्राव येणे, घाण येणे ही कफाची लक्षणे मानली जातात.

या सर्व विकारांची चिकित्सा करताना सात क्रियाकल्पांचे वर्णन केले आहे. नेत्राभोवती उडदाच्या पिठाचे पाळे तयार करून त्यात औषधी तूप, काढे टाकून त्यांच्या साह्याने चिकित्सा करणे, हे तर्पण व पुटपाक या क्रियाकल्पात अंतर्भूत होतो. यालाच नेत्रबस्ती असे म्हणतात.
डोळ्यात औषधीद्रव्याचा सुरमा लावणे म्हणजे अंजनकर्म होय. यामुळे डोळे स्वच्छ राहतात. औषधी काढ्यांचे थेंब डोळ्यात सोडल्याने अथवा डोळ्यावर औषधी काढ्याची धार धरल्याने डोळ्यांच्या ठिकाणी असलेला लालीमा, खाज, टोचणी, स्राव येणे ही लक्षणे दूर होण्यास मदत होते.

बिडालक म्हणजे औषधी द्रव्यांचा पापण्यांभोवती लेप लावणे व पिंडीका म्हणजे औषधी द्रव्यांचा गोळा पुरचुंडी करून डोळ्यावर बांधणे होय. याद्वारे रक्‍तदृष्टीमुळे होणारे विविध विकार दूर केले जातात. सर्व क्रियाकल्पे तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली केल्यास दृष्टीचे रक्षण करता येते.

चिकित्सेसह दिनचर्या, ऋतुचर्येचे पालन केले, तर नेत्रविकारांपासून दूर राहता येते. डोळ्यावर मोगऱ्याची फुले ठेवणे, जेवणात गायीच्या तुपाचा वापर करणे, मध, खडीसाखर, सैंधवमीठ यांचा वापर करणे, पिकलेली केळी, द्राक्षे, मनुका, डाळिंब, खजूर यांचे पन्हे घेणे, सुका आवळा, मुगाचे पदार्थ, शेवगा, तिळाच्या तेलाने सर्वांग अभ्यंग करणे, जागरण टाळणे, संगणकासमोर कमी बसणे आदी पथ्य पाळली तर, डोळ्यांचे विकार टाळता येतात. संगणकाचा अतिवापर करणाऱ्यांसाठी डोळ्यांची उघडझाप सतत करणे, दर 10-15 मिनिटांची काही सेकंद दृष्टी दुसरीकडे वळविणे, योग्य चष्मा लावणे व संगणक नजरेच्या थोडा खाली ठेवणे आवश्‍यक आहे. जेवणानंतर हात धुतल्यावर तळहात आपापसात घासून डोळ्यावर ठेवल्यास डोळ्यांचे विकार कमी होण्यास मदत होते.

डोळ्यांसाठी दररोजची निगा
-आठवड्यातून एक वेळा अंजन केले पाहिजे. यामुळे डोळे निर्मळ राहतात.
-त्रिफळासेवन, रक्‍तमोक्षण, वमन, विरेचन, मनाचे समाधान, अंजन, नस्य, तळपायांची काळजी आणि घृतसेवन हे दृष्टी रक्षनाचे उपाय आहेत.
– बूट वापरणे, तळपायांना तूप लावणे व पाय धुणे हितकारक आहे.
-ताजे गरम अन्न खावे
– दाडीम, खजूर यांचे पन्हे जरूर प्यावे
-आवळा व आवळ्याचे पदार्थ खावेत
-फळभाज्या आणि शेवगा अवश्‍य खावा
-गायीचे तूप रोजच्या वापरात असावे
-लोणी आहाराचा भाग असावा
– सैंधवमीठ (शेंदेलोण) खावे
-मुगाचे पदार्थ जरूर खावेत

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.