वयात येणाऱ्या मुलींशी बोलायलाच हव्यात या गोष्टी, वेड्या वयात त्यांना हे सांगाच…कारण..

सानियाची आई तिला घेऊन भेटायला आली. एकूण निरीक्षणावरून ती फारशी शिकलेली असावी असे वाटत नव्हते. तिने सानियाला जबरदस्तीने खुर्चीवर बसवले. सुरुवातीला ती बसायला तयार नव्हती. पण आई रागावल्यावर बसली. मान खाली घालून ती नुसती बसून राहिली.

“काय करू या मुलीचं; काही कळत नाही. रोज मार खाते वडिलांचा पण हिला समजत म्हणून नाही. मी पण खूप वेळा मारलं हिला, पण हिला अक्‍कलच येत नाही. काय करू आता तुम्हीच सांगा, नाहीतर पोरगी हाताबाहेर जायची. तिच्या कॉलेजच्या बाईंनी इकडे यायला सांगितलं म्हणून आणलं. आपल्याला त्यातलं काही कळत नाही. पण ही रोज मुलांबरोबर खेळते, गप्पा मारत बसते, कॉलेजात पोरा-पोरींसंगं फिरायला जाते. किती आणि कसं समजवावं काही समजत नाही. आता तुम्हीच समजवा.’

त्यांचा सगळा राग शांत झाल्यावर प्रथम सानियाला बाहेर बसण्यासाठी पाठवलं. मग पुन्हा आईशी बोलायला सुरुवात केली. सानिया एका गरीब कुटुंबातली मुलगी होती. घरात आई-वडील, दोन भाऊ आणि सोनिया असे पाच सदस्य होते. सानिया सर्वात धाकटी.
“खरं सांगू का आम्ही दोघंही परिस्थितीमुळे फार शिकू शकलो नाही.

जेमतेम 10वी पर्यंतच शिक्षण घेतलंय. तिचे वडील रिक्षा चालवतात आणि मी स्वयंपाकाची कामं करते. कसेबसे पैसे मिळवून यांना शिकवलंय. सानिया पण आधी खूप शहाणी होती. आम्ही राहतो तो भाग तितकासा चांगला नाही. म्हणून आधी ती बाहेर पण जायची नाही. पण आता उलटं झालंय.

घरात पाय ठरतच नाही. सारखी कोणा ना कोणाबरोबर बोलत बसते, नाहीतर फिरत बसते. घरातल्या कामांना हात लावत नाही. आपण चिडलं, बोललं की ही आणखीनच चिडचिड करते. परवा शेजारच्या दोन बायकांनी हिला एका मुलाबरोबर फिरताना पाहिलं, हे कळल्यावर तिच्या वडिलांनी तिला खूप मारलं. खूप रागावले तर दोन दिवस जेवलीच नाही. सतत उलटी उत्तरं देत राहते. प्रेमाने, रागावून सगळ्या पद्धतीने समजावलं तिला.

पण काही उपयोग झाला नाही. वागण्यात काही फरक नाही. त्यात हिचे वडील खूप तापट स्वभावाचे ते चिडले की कोणाचं ऐकत नाहीत. काय करावं काही कळेना झालंय. म्हणून कॉलेजात जाऊन तिच्या बाईंनाच भेटून आलो. त्यांनी इकडे यायचं सुचवलं. म्हणून आलो. काय करावं? तुम्ही सांगा.’
बोलताना आईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्या रडायला लागल्या. त्या थोड्या शांत झाल्यावर त्यांना बाहेर बसवून सोनियाला आत बोलावलं.

सानिया आत येऊन बसली खरी; पण ती या सत्रात फारसं काही बोलली नाही. विचारलेल्या प्रश्‍नांची तिने जेवढ्यास तेवढी उत्तरे दिली. पण तिचा विश्‍वास संपादन केल्यावर व मोकळेपणाने संवाद साधल्यावर ती हळूहळू बोलायला लागली.

पुढील सत्रात अगदी मोकळेपणाने बोलण्याची तिने तयारी दाखवली. ठरल्याप्रमाणे ती सत्राला भेटायला आली. या सत्रात ती पूर्वीपेक्षा थोडं अधिक मोकळेपणाने बोलली. पण संपूर्ण सत्रात ती तिच्या आई-बाबांच्या वागण्याबद्दल ओरडण्याबद्दल सांगत होती. तिला त्यांचं हे वागणं अजिबात आवडत नव्हतं.

पण आपल्या वागण्यातला बदल तिने मान्य केला. अर्थातच आपलं वागणं बरोबर आहे हे सांगण्याचा; समर्थन करण्याचा तिने प्रयत्नही केला जो तिच्या वयाला तिने करणं योग्य होता. पण यामागील कारण तिला माहीत नव्हते म्हणून या सत्रात ती आणखी मोकळेपणाने बोलल्याने पुढील सत्रात तिला तिच्या वागण्यात झालेल्या बदलांमागचे कारण, “वयात येणे’ तिला शास्त्रीय भाषेत व पद्धतीने समजावून सांगितले.

तिच्या मनात येणारे विचार, कराव्याशा वाटणाऱ्या कृती तिच्याकडून होत असलेले वर्तन या साऱ्याबाबत तिला शास्त्रीय पद्धतीने माहिती दिली.
तिनेही ती नीट समजून घेतली व त्यानंतर आपल्यातील या नवीन बदलांची तिला नव्याने ओळख झाली. या बदलांना कसे सामोरे जायचे. ते स्वीकारून स्वत:च्या वर्तनात काय बदल करायचे? या आणि अशा इतर मुद्द्यांवर तिने मोकळेपणाने चर्चा केली. तिच्या साऱ्या शंकांचं निरसन करून घेतलं.

त्यानंतर सानियाच्या आई-वडिलांचीही काही सत्रे घेतली व त्यांनाही साऱ्या बदलांच्या कारणांची सविस्तर माहिती देण्यात आली. या बदलांना पालक म्हणून कसे हाताळावे?
तिच्याबरोबरच्या वागण्यात काय व का बदल करावेत, याबाबत त्यांना सविस्तर माहिती दिली. आई-वडील व सोनिया तिघांनीही उत्तम प्रतिक्रिया व सहकार्य केल्याने सोनियाची समस्या आपोआपच सुटली व आई-वडिलांचा रागही निवळला.वयात येण्याची प्रक्रिया ही गुंतागुंतीची असते आणि या काळात मुला-मुलींच्या मनात व्यवस्थेविरुद्धच्या बंडाचे विचार येत असतात, यात काहीही वावगे नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.