बंगळुरू – पब्लिसिटीचा नाद खुळा असतो याची झलक एका तरूणाने मंगळवारी बंगळुरूत दाखवली. त्या तरूणाने चक्क उड्डाणपुलावरून 10 रूपयांच्या नोटांचा वर्षाव केला. त्यामुळे परिसरात मोठाच गलबला झाला. बंगळुरूमधील वर्दळीच्या परिसरात सकाळच्या सुमारास अचानकपणे उड्डाणपुलावरून नोटा पडू लागल्या.
त्या उचलण्यासाठी अनेकांची धावपळ उडाली. त्यामुळे गोंधळाची स्थिती उद्भवून वाहतूक कोंडी झाली. नोटांची उधळण करणारा मनोरूग्ण असावा असे प्रारंभी सर्वांनाच वाटले. मात्र, पोलिसांनी अटक केल्यानंतर 30 वर्षीय तरूणाने झटपट प्रसिद्धीसाठी ते कृत्य केल्याचे सांगितले. संबंधित तरूण उपजीविकेसाठी मार्केटिंग आणि अँकरिंग करतो. त्याने सुमारे 3 हजार रूपये किमतीच्या नोटांची उधळण केल्याचे समजते.
त्याच्या त्या कृत्याचा व्हिडीओ मित्राने बनवला. सोशल मीडियावर व्हिडीओ अपलोड करून प्रसिद्धी मिळवण्याचा तो सर्व खटाटोप असल्याचे स्पष्ट झाले. प्रसिद्धीचा हव्यास कुणाला काय करायला लावेल त्याचा नेम नाही हेच संबंधित घटनेने पुन्हा एकदा समोर आले.