पारगाव (दौंड) – दौंड तालुक्यातील पारगाव येथील भीमा नदीपात्रात गेली सात दिवसांत पती, पत्नी, मुलगी, जावई व 3 मुले असे सात जणांचे मृतदेह सापडले आहेत. मुलाने नातेवाईकातीलच विवाहित मुलगी पळवून नेल्याच्या रागात वडिलांसह कुटुंबातील 7 जणांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. मुलीला 24 तासांत सोडून ये, अन्यथा कुटुंबासह विष पितो, अशी धमकी वडिलांनी दिली होती. या घटनेने दौंड तालुक्यासह राज्यात खळबळ उडाली आहे.
संगीता मोहन पवार (वय 40, रा. खामगाव, ता. गेवराई, जि. बीड), शाम पंडित फुलवरे (वय 28, रा. हातोला, ता. वाशी, जि. उस्मानाबाद), राणी शाम फुलवरे (वय 24, रा. हातोला), मोहन उत्तम पवार (वय 45, रा. खामगाव), रितेश शाम फुलवरे (वय 7), छोटू शाम फुलवरे (वय 5), कृष्णा शाम फुलवरे (वय 3, तिघे रा. हातोला) अशी या घटनेतील मृतांची नावे आहेत. सध्या हे सर्वजण पारनेर तालुक्यातील निघोज या गावी राहत होते. हे कुटुंब मंगळवारी (दि. 17) रात्री अकरानंतर वाहनाने निघोज या गावातून निघाले होते.
शिरूर – चौफुला रोडवर असलेल्या दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीत भीमा नदीच्या पात्रात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृतदेह आढळून आले होते. 18 जानेवारी रोजी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर 20, 21 आणि 22 जानेवारी रोजी तीन मृतदेह आढळून आले याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहन व संगीता पवार यांची राणी फुलवरे ही मुलगी असून शाम हा जावई आहे. तर रितेश, छोटू, कृष्णा ही राणी व शाम फुलवरे यांची मुले आहेत.
एक वर्षापासून शाम फुलवरे हा सासरे मोहन पवार, सासू व मेहुणा अनिल यांच्यासह पारनेर तालुक्यातील निघोज येथे राहून मजुरी करत होता. आज पारगाव येथे भीमानदी काठी शाम फुलवरे याची बहीण संगीता अंकुश विटकर व चुलती शालन रंगनाथ फुलवरे, चुलता, आजी, मेहुणे आदी नातेवाईक गोळा झाले होते. हे सर्वजण जमिनीवर चाऱ्या खोदाईची कामे करतात. त्यामुळे कायमस्वरूपी कोणत्याही एक गावी ते रहात नाहीत.
पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी घटनास्थळी भेट दिली. वैद्यकीय अधिकारी व परिस्थितीजन्य वस्तूस्थितीच्या आधारे यवत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा येथील एकूण पाच विविध पथकांच्या सहाय्याने यवत पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे हे तपास करीत आहेत.
“मृतदेहांच्या अंगावर कुठल्याही जखमा नाहीत. शवविच्छेदनाच्या अहवालानुसार पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याचे प्रथम दर्शनी दसत आहे. गुन्ह्याच्या बाबतीतील सर्व शक्यता आम्ही पडताळून पहात आहोत.”
– आनंद भोईटे, अपर पोलीस अधीक्षक
शाम फुलवरे याची बहीण संगीत विटकर हिने सांगितले, शाम हा पोहण्यात फार हुशार होता. 50फूट खोल पाणी असलेल्या विहिरीतून तो दगड घेऊन वर येत असे. मग तो नदीच्या पाण्यात बुडाला कसा? हा न कळण्यासारखा प्रश्न आम्हाला पडला आहे.
वैद्यकीय अहवालानुसार पहिल्या चार जणांचा बुडून मृत्यू झाला असे आहे; परंतु जर का ही आत्महत्या असेल तर पूर्ण कुटुंबाने एकाच वेळी हा निर्णय का घेतला, असे कोणते महाकारण आहे, हे शोधणे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.