खड्ड्यांच्या केवळ तेराशे तक्रारी

शहरातील रस्त्यांची चाळण : नागरिकांचे हाल, प्रशासन सुस्त

पिंपरी – पावसामुळे पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीतील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या खड्ड्यांबाबत शहरातील जागृती नागरिकांनी गेल्या 5 महिन्यांत एकूण 1 हजार 335 तक्रारींचा अक्षरश: पाऊस पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनासमोर पाडला आहे. त्यापैकी 1 हजार 066 खड्डे दुरूस्त केल्याचा दावा कागदोपत्री केला जात असला तरी हा दावा खोटा असल्याचे बोलले जात आहे. रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य असताना असा दावाच प्रशासन करू कसे शकते? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

सततच्या जोरदार पावसामुळे शहरातील प्रमुख आणि अंतर्गत रस्ते खराब झाल्याचे ठरलेले उत्तर पालिका प्रशासन देत आहे. रस्त्याचा दर्जा योग्य नसल्याने रस्ते काही महिन्यातच खराब होत असल्याचे उघड सत्य आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्यात रस्ते अक्षरश: वाहून जात असल्याचे चित्र आहे. रस्त्यांवरील खड्डयामुळे वाहनचालकांसह पादचारी वैतागले आहेत. हे खड्डे तातडीने दुरूस्त करण्याची पालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहे.

शहरातील सजग नागरिक विविध माध्यमातून तक्रारी करून खड्डे दुरूस्तीसाठी मागणी करीत आहेत. एक जून ते 31 ऑक्‍टोबर या 5 महिन्यांच्या कालावधीत पालिकेस एकूण 1 हजार 335 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सारथी हेल्पलाईन, पालिका संकेतस्थळ, व्हॉट्‌स ऍप क्रमांकावर या तक्रारी मिळाल्या आहेत. या तक्रारी सारथी विभागाकडून संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठविल्या जातात. त्यांच्याकडून 7 दिवसांच्या आत कारवाई करणे बंधनकारक आहे.

संबंधित स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांना या तक्रारी पाहण्यासाठी स्वतंत्र डॅशबोर्ड तयार केले आहे. त्यासाठी त्यांना लॉगिंग उपलब्ध करून दिले आहे. तक्रार मिळाल्यानंतर त्याचे निरसन झाल्यानंतर तशी नोंद डॅशबोर्डवर केली जाते. या तक्रारींपैकी एकूण 1 हजार 66 खड्डे बुजविण्याल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. अद्याप 169 खड्डे बुजविले गेले नाहीत, असे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मात्र, शहरात पाहणी केल्यास हजारो खड्डे अद्याप कायम असल्याचे धक्कादायक चित्र शहरात आहे.

तोंडी व फोनवरील तक्रारींची नोंद नाही
पालिकेच्या प्राप्त झालेल्या तक्रारींची ही संख्या आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर आणि त्याचे निरसन केल्यानंतर तक्रारदाराला एसएमएस केला जातो. मात्र, नागरिकांकडून तोंडी, फोन आणि नगरसेवकांकडून अधिकारी व संबंधित विभागाकडे आलेल्या तक्रारींची नोंद यामध्ये नाही. ती संख्या ग्राह्य धरल्यास तक्रारींची संख्या प्राप्त तक्रारींच्या दुप्पटीपेक्षा अधिक होते.

“ड’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वांधिक खड्डे
क्षेत्रीय कार्यालयानुसार खड्ड्यांच्या तक्रारी व दुरूस्तींची संख्या पुढीलप्रमाणे आहे.”अ’ क्षेत्रीय कार्यालय 190 पैकी 120 खड्डे बुजविले आहेत. “ब’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील 160 पैकी 121 खड्डे दुरूस्ती केले आहेत. “क’ क्षेत्रीय कार्यालयात 106 पैकी 92 खड्डे बुजविले आहेत. “ड’ क्षेत्रीय कार्यालयात सर्वांधिक 293 पैकी 230 खड्डे दुरूस्त केले आहेत. “ई’ क्षेत्रीय कार्लालयात 150 पैकी 137, “फ’ क्षेत्रीय कार्यालयात 187 पैकी 165, “ग’ क्षेत्रीय कार्यालयात 155 पैकी 121 आणि “ह’ क्षेत्रीय कार्यालयात 94 पैकी 80 खड्डे बुजविले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.