दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील बहुचर्चित अभिनेत्री आणि यंदाच्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारी कीर्ती सुरेश सध्या आपल्या पहिल्यावहिल्या बॉलीवूड चित्रपटाबाबत बरीच उत्सुक दिसत आहे. “मैदान’ या चित्रपटात अजय देवगणसोबत ती झळकणार आहे. हा चित्रपट फुटबॉलच्या खेळावर आधारित आहे.
कीर्ती ही दक्षिणेकडील दिग्गज नायिका म्हणून ओळखली जाते. अलीकडेच तेलगू भाषेत बनलेल्या “महानती’ या बायोपिकमध्ये साकारलेल्या सावित्री नामक व्यक्तीरेखेसाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. याखेरीज दक्षिणेकडील अनेक पुरस्कार आणि राज्य सरकारांचेही अनेक पुरस्कार मिळवून कीर्तीने स्वतःचे अभिनयकसब सिद्ध केले आहे.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत डझनभराहून अधिक सुपरहिट चित्रपट देणारी ही नायिका आता बॉलीवूडच्या “मैदाना’त काय जादू करते ते पाहायचे. “मैदान’ या चित्रपटात 1952 ते 1962 च्या काळातील फुटबॉलचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात कीर्तीने अजयच्या पत्नीची व्यक्तिरेखा साकारली आहे.