- पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी व्यक्त केली खंत
पिंपरी – पोलीस दलातील 95 टक्के कर्मचारी व अधिकारी प्रामाणिक आहेत. केवळ पाच टक्के पोलिसांमुळे पोलीस खाते बदनाम होत आहे, अशी खंत पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पोलिसांचे कौतुकही केले. चिंचवड येथे पोलीस आयुक्त आणि नागरिक यांच्यातील संवादाकरिता थेट-भेट कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी (दि. 30) केले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहायक आयुक्त डॉ. सागर कवडे, चिंचवडचे वरिष्ठ निरीक्षक सुधाकर काटे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजीत खुळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. नागरिक पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना प्रश्न विचारत होते आणि आयुक्त त्या प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तर देत होते. पोलीस पैसे घेतल्याशिवाय कामच करीत नाही. एका बेपत्ता व्यक्तीचे लोकेशन शोधण्यासाठी पोलिसांनी पैशाची मागणी केली होती, असा थेट आरोप एका तरुणीने केला. त्यास उत्तर देताना आयुक्तांनी 95 टक्के पोलीस प्रामाणिक असल्याचे सांगितले. पाच टक्के पोलिसांमुळे खाते बदनाम होत असल्याची खंत व्यक्त केली.
सध्या डिजिटलचे युग आहे. अशावेळी पोलीस चौक्या देखील डिजिटल कराव्यात. ज्यामुळे नागरिकांना पोलीस स्टेशनला न जाता जवळच्या चौकीत जाऊन तक्रार देता येईल, असा मुद्दा माधुरी कवी यांनी उपस्थित केला. यावर बोलताना आयुक्त म्हणाले, पोलीस स्टेशन डिजिटल होत आहेत. त्यासोबतच पोलीस चौक्या देखील डिजिटल व्हायला हव्यात, हा मुद्दा रास्त आहे. आयुक्तालय नवीन असल्याने समस्यांचा डोंगर उभा आहे. मात्र पुढील सहा महिन्यांत पोलीस चौक्यादेखील डिजिटल करण्याचा प्रयत्न करू. सर्व चौक्या मोबईल अपद्वारे जोडल्या जातील. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सोशल मीडियावरील हवे तेवढे सक्रीय नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना जोडून घेण्याचा देखील प्रयत्न केला जाईल.
शहरातील गुन्हेगारी घटनांमध्ये तरुणांचा सहभाग आणि तरुणांमधील वाढती गुन्हेगारी याबाबत सुप्रिया सबनीस यांनी विचारले त्यास आयुक्तांनी उत्तर दिले. “पोलिसांकडून याबाबत सकारात्मक काम केले जात आहे. अल्पवयीन मुले आणि काही तरुण अजाणतेपणाने गुन्हेगारी घटनांकडे आकर्षिली जातात. पोलिसांकडून त्यांचे सर्वेक्षण करून योग्य दिशा देण्याचे काम सुरु आहे. नगरसेवक सुरेश भोईर यांनी पदपथांवर होणारी पार्किंग आणि बीआरटी मार्गावर लावली जाणारी वाहने याबाबत मुद्दा उपस्थित केला. त्यावर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
पोलीस कर्तव्यावर असताना दारू पितात, तर अशा वेळी नागरिकांनी काय करायला हवे. असा प्रश्न रेखा क्षीरसागर यांनी विचारला. त्यावर उत्तर देताना आयुक्त म्हणाले, ‘याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती द्या. त्याची चौकशी करून तत्काळ कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी यावेळी दिले.