पिंपरी – आयटीनगरी, हिजवडीत ऑनलाइन माध्यमातून चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा हिंजवडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईमध्ये चार तरुणींची सुटका केली. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल केला असून तिघांना अटकही केली आहे.
जीवन संतोष ताथवडे (वय 23, रा. चिंचवडेनगर, चिंचवड. मूळ रा. पिंपळवाडी, ता. खेड), रामदास सोपानराव साळुंखे (वय 62, रा. येरवडा, पुणे), अनिकेत चंद्रकांत भालेराव (वय 26, रा. शिंदेवस्ती रोड, गणेशनगर, रावेत) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह केशव, राहुल, दीपक उर्फ बॉबी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हिंजवडी परिसरात ऑनलाईन माध्यमातून वेश्या व्यवसायासाठी ग्राहकांचा शोध, आर्थिक देवाण घेवाण केली जात असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता ऑनलाइन वेबसाईट आणि मोबाइल क्रमांक आढळले. बनावट गिऱ्हाईकामार्फत पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला. त्यात पोलिसांनी महाराष्ट्र, आसाम आणि बिहार राज्यातील चार तरुणींची सुटका केली. अटक केलेल्या तीन आरोपींकडून रिक्षा, दोन मोबाइल फोन असा एकूण 70 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत हिंजवडीचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड यांनी फिर्याद दिली आहे.
असे चालत होते रॅकेट
आरोपींनी त्यांचे मोबाइल क्रमांक वेबसाइवर दिले होते. ग्राहकांनी वेबसाइटवरून नंबर घेऊन आरोपींशी संपर्क केल्यास ग्राहकांच्या मोबाइल फोनवर फोटो पाठवले जात. ग्राहकांना पसंत पडलेल्या मुलींना ग्राहकाने सांगितलेल्या ठिकाणी पाठवून दिले जात. यासाठी आठ हजार ते 20 हजार रुपयांपर्यंत पैसे घेतले जात होते. पोलिसांच्या तपासात भूमकर वस्ती येथील आदिती एक्झिक्युटिव्ह ओयो या हॉटेलचा वेश्या व्यवसायासाठी वापर झाल्याचे निष्पन्न झाले आहे.