- दरोडा विरोधी पथकाकडून आरोपींना अटक
पिंपरी – प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी ठराविक कालावधीनंतर मोबाइल फोन बदलून द्यायचा. तिच्याकडून अगोदरच मोबाइल फोन घेऊन तो विकायचा, असा सपाटा लावलेल्या दोन चोरट्यांना दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून 26 स्मार्ट फोन आणि तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
सागर मोहन सावळे (वय 22, रा. अष्टविनायक चौक, मोरेवस्ती, चिखली), निलेश देवानंद भालेराव (वय 19, रा. नेवाळे वस्ती, घरकुल, चिखली) अशी अटक केलेल्या चोरट्यांनी नावे आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथकाचे उपनिरीक्षक मंगेश भांगे यांना आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यानुसार भोसरी पीएमटी बस स्टॉप येथे एमएच-14-एचबी-3909 या दुचाकीवरून आलेल्या आरोपी सावळे आणि भालेराव यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे आठ मोबाइल फोन आणि एक दुचाकी मिळून आली. पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून 26 स्मार्ट फोन आणि तीन दुचाकी असा एकूण 4 लाख 12 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.
आरोपी सागर आणि निलेश यांच्या प्रेयसींना इम्प्रेस करण्यासाठी ठराविक दिवसांच्या अंतराने चोरलेले मोबाइल फोन वापरण्यासाठी देत असत. प्रेयसीकडे पहिला मोबाइल फोन द्यायचा आणि दुसरा मोबाइल फोन चोरायचा. त्यानंतर चोरलेला दुसरा मोबाइल फोन प्रेयसीला वापरायला द्यायचा आणि तिच्याकडून पहिला मोबाइल काढून घ्यायचा. काढून घेतलेला पहिला मोबाइल फोन विकायचा आणि त्यातून आलेल्या पैशांवर मौजमजा करायची. असा सपाटा या दोघांनी मागील काही महिन्यांपासून लावला होता. त्यांनी तब्बल 26 स्मार्टफोन तसेच तीन दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.
या कारवाईमुळे पिंपरी, भोसरी तीन, एमआयडीसी भोसरी दोन आणि शिरवळ पोलीस ठाण्यातील एक असे एकूण नऊ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक उत्तम तांगडे, उपनिरीक्षक मंगेश भांगे, अंमलदार महेश खांडे, राजेंद्र शिंदे, उमेश पुलगम, राहुल खारगे, विक्रांत गायकवाड, नितीन लोखंडे, आशिष बनकर, सागर शेडगे, प्रवीण माने, राजेश कौशल्ये, गणेश कोकणे यांच्या पथकाने केली.