मुंबई – भातखरेदीसाठी शासनाकडून ऑनलाइन नोंदणीच्या मुदतीत 15 जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित राहिल्यामुळे शासनाने ही मुदतवाढ दिली आहे. याआधी 31 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती.
पणन हंगाम 2023-24 मधील खरीप हंगामातील भातविक्री करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीचा सात-बारा घेऊन नोंदणी करणे आवश्यक करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी केली. जिल्ह्यातील 43 पैकी 30 हून अधिक भातखरेदी केंद्रांवर भातखरेदी सुरू झाली आहे.
जिल्ह्यातील तालुका खरेदी-विक्री संघाकडून नोंदणीची मुदत वाढवावी, अशी मागणी शासनाकडे केली होती. त्यानुसार शासनाने 15 जानेवारीपर्यंत ऑनलाइन नोंदणीसाठी मुदतवाढ दिली आहे. हमीभाव खरेदीपासून शेतकरी वंचित राहू नयेत म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे शासनाकडून सांगण्यात आले आहे.