Pro-Kabaddi League 2023-24 (New Delhi) :- प्रो-कबड्डी लीगमध्ये मंगळवारी झालेल्या लढतीत दबंग दिल्ली संघाने गुजरात जायंट्स संघाचा 35 विरुद्ध 28 असा पराभव केला. या सामन्यात दोन्ही संघांनी एकमेकांच्या तोडीसतोड खेळ करत कबड्डी शौकीनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. या विजयासह दबंग दिल्लीने जायंट्सच्या विजयी वाटचालीला ब्रेक लावला आहे.
दंबग दिल्ली ने जायंट्स के जीत के सिलसिले पर लगाया ब्रेक 😎
हाई-वोल्टेज प्रदर्शन ⚡के साथ बजाया जीत का बिगुल 🥁#ProKabaddiLeague #ProKabaddi #PKLSeason10 #PKL #HarSaansMeinKabaddi #GGvDEL #GujaratGiants #DabangDelhiKC pic.twitter.com/wKZKKrS8ht
— ProKabaddi (@ProKabaddi) January 2, 2024
या सामन्याच्या पहिल्या सत्रात गुजरात जायंट्सने दबंग दिल्लीवर १२ विरुद्ध ९ अशी अवघ्या ३ गुणांची निसटती आघाडी घेतली होती. त्यात गुजरातच्या राकेश व प्रतिक दहिया यांनीजोरदार खेळाचे दर्शन घडवले. या जोडीने चांगल्या चढाया करताना पकडीही अफलातून केल्या मात्र, त्याला दिल्लीच्या खेळाडूंनीही आफलातून प्रत्युत्तर दिले. दिल्लीच्या अशू मलिक व मंजीतने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत सामन्यात सातत्याने निर्माण होत असलेली रंगत टीकवली. हे सत्र संपल्यावर दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करत आपापल्या डगआऊटमध्ये परतले व खिलाडूवृत्तीचेही दर्शन घडवले.
दुसरे सत्र सुरु झाल्यावरही त्यांच्यातील चुरस कायम राहिली. पहिल्या सत्रात वर्चस्व राखलेल्या राकेश व दहियाला या सत्रात मात्र फारसे यश लाभले नाही. याउलट दिल्लीच्या असू व मंजीतने सातत्याने बाजी मारली. या जोडीने जोरदार पकडी करताना रेड गुणांचीही कमाई केली. तसेच या जोडीने सर्वबादचे गुणही संघाला मिळवून दिले. सामना संपण्यास पाच मिनिचे बाकी असताना कर्णधार असलेल्या अशूने ११ गुणांची कमाई करताना दिल्लीला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी कमी करण्यासाठी गुजरातच्या खेळाडूंनी अत्यंत कडवी लढत दिली मात्र, दिल्लीसमोर त्यांचा निभाव लागला नाही.
Ultimate Kho Kho Season 2 : रोमांचक सामन्यात चेन्नई-ओडिशा बरोबरी…
दिल्लीने अखेरच्या काही मिनिटांमध्ये अफलातून व भक्कम बचावाचे दर्शन घडवले. दिल्लीच्या योगेश व आशिष यांनीही उत्तम बचाव करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दिल्लीच्या मितु शर्मानेही अफलातून चढाई करत गुजरातच्या खेळाडूंवर दडपण कायम ठेवले. दिल्लीच्या संघाने पहिल्या सत्रातील अपयश या सत्रात मात्र मागे टाकत सर्वोत्तम खेळ केला. दुसरीकडे पहिल्या सत्रात वरचढ वाटत असलेला गुजरातचा संघ नंतरच्या सत्रात फारसा आक्रमक खेळ करु शकला नाही. अखेरच्या मिनिटांतही दिल्लीनेच आघाडी कायम राखली व गुजरातवर रंगतदार लढतीत मात करत स्पर्धेत आगेकूच कायम ठेवली.