पुणे -महावितरणच्या पुणे परिमंडलातील वीजग्राहकांनी “ऑनलाइन’ भरणा करण्यामध्ये राज्यात आघाडी कायम ठेवली आहे. गेल्या मे महिन्यांत घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिकसह इतर 20 लाख 15 हजार लघुदाब वीजग्राहकांनी तब्बल 564 कोटी 99 लाख रुपयांचा ऑनलाइनद्वारे भरणा केला आहे. या शिवाय, ऑनलाइन बील भरण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी लघुदाब वीजग्राहकांनी क्रेडिट/डेबीट कार्ड, यूपीआय, भीम, इंटरनेट बॅंकींग, मोबाइल वॉलेटद्वारे ऑनलाइन वीजबिल भरल्यास दरमहा 500 रुपयांच्या मर्यादेत प्रत्येक महिन्याच्या वीजबिलामध्ये 0.25 टक्के सूट देण्यात येत आहे.
महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, पुणे परिमंडलामध्ये गेल्या एप्रिल ते सप्टेंबर 2022 पर्यंत लघुदाब वर्गवारीतील सरासरी 17 लाख 41 हजार 860 वीजग्राहक दरमहा ऑनलाइन वीजबिल भरणा करीत होते. ही संख्या ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 पर्यंत 18 लाख 64 हजार 820वर गेली. त्यानंतर जानेवारी ते मे 2023 पर्यंत सरासरी दरमहा ग्राहकांची संख्या 20 लाख 21 हजार 130वर गेली आहे. सरासरी 1 लाख 56 हजार 330 वीजग्राहकांची गेल्या 5 महिन्यांमध्ये वाढ झाली आहे.
पुणे शहरातील 11 लाख 30 हजार 225 लघुदाब घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांनी 312 कोटी 87 लाख रुपयांच्या वीजबिलांचा ऑनलाइन भरणा केला आहे. यामध्ये महावितरणच्या बंडगार्डन विभागातील सर्वाधिक 1 लाख 91 हजार 913 ग्राहकांचा समावेश आहे. उर्वरित शिवाजीनगर, कोथरूड, नगररोड, पद्मावती, पर्वती व रास्तापेठ विभागांमध्ये सरासरी 1 लाख 56 हजार 385 वीजग्राहकांनी ऑनलाइन वीजबिल ऑनलाइन भरले आहे.