श्रीगोंदा -एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांना मदतीचा हात देणारे किरण निंभोरे व राणी डफळ ही जोडी घरातच आई, वडिलांच्या साक्षीने लग्नाच्या बेडीत अडकली आहे. लग्नात भोजनाचा वाचलेला खर्च हा पुण्यातील एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या दोन हजार विद्यार्थ्यांची दोन वेळची भूक भागविण्यासाठी देण्यात येणार आहे.
या आगळ्या वेगळ्या विवाहाचे फेसबुक, यू-ट्यूबवर लाईव्ह प्रक्षेपण दाखविण्यात आले. वऱ्हाडी मंडळींनी या लाडक्या जोडीवर घरात बसून, ऑनलाईन अक्षता टाकल्या. हा विवाह सोमवारी श्रीगोंदा तालुक्यातील घोटवी येथे पार पडला. श्रीगोंदा तालुक्यातील घोटवी येथील वसंतराव निंभोरे यांचे चिरंजीव किरण, तर येळपणे येथील वाल्मीक डफळ यांची कन्या राणी यांचा सहा महिन्यांपूर्वी विवाह निश्चित झाला होता. 27 एप्रिल 2020 हा विवाहाचा मुहूर्त काढण्यात आला होता.
मात्र करोनामुळे वधू-वरांनी फक्त आई, वडिलांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन केले. परिसर सॅनेटाईज करण्यात आला होता. यावेळी सुमारे एक हजार 500 चाहत्यांनी आपआपल्या घरी बसून या जोडीला ऑनलाईन शुभेच्छा दिल्या. किरण एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यू -ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून मार्गदर्शन करत आहेत, तर राणी या मनमाड येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. वाचलेल्या पैशातून पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय करण्यात येणार आहे.