लोणी काळभोर -पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने करोना रोग प्रतिबंधक संचारबंदी कालावधीत एका सराईताकडून गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस असा एकूण 50,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.
सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, ज्ञानेश्वर क्षिरसागर, गुरु गायकवाड, सुभाष राऊत, काशिनाथ राजापुरे, प्रमोद नवले हे पोलीस पथक 9 एप्रिल रोजी सायंकाळी उरुळीकांचन ग्रामपंचायतींच्या हद्दीत गस्त घालत होते.
पथकातील महेश गायकवाड व निलेश कदम यांना उरुळीकांचन दत्तवाडी रोड येथे निळा टी शर्ट घातलेला पवन मिसाळ नावाचा तरूण दहशतीसाठी त्याचे कमरेला गावठी पिस्टल बाळगून फिरत आहे अशी खात्रीशीर बातमी एका खबऱ्यामार्फत मिळाली होती.
त्यानुसार गुन्हे शाखेचे पथकाने तात्काळ दत्तवाडी रोड येथे जावून सापळा रचून बातमीतील वर्णनाप्रमाणे निळा शर्ट असलेला व संशयास्पदरित्या थांबलेला पवन उर्फ प्रशांत गोरख मिसाळ (वय 26, रा. दत्तवाडी, उरुळी कांचन) याला पळून जात असताना पाठलाग करून ताब्यात घेतले.
त्याच्याकडून विनापरवाना व बेकायदेशीर हेतुस्तव कमरेला बाळगलेले गावठी पिस्तूल व 1 जिवंत काडतूस असा 50300 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.