कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी 106 कोटी रुपयांच्या प्रतीक्षेत
पुणे – राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील 9 हजार 884 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना 106 कोटी 74 लाख 72 हजार रुपयांचे अनुदान विधीमंडळ चर्चेनुसार अर्थ विभागाने मंजूर केले आहे. या अनुदानाबाबतचे आदेश शासनाने जारी करावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.
राज्यातील 1 हजार 779 शाळा, 598 तुकड्या व 1 हजार 929 अतिरिक्त शाखांवरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अनुदान उपलब्ध करुन देण्याची मागणी शासनाकडे अनेकदा करण्यात आलेली आहे. त्यावर बऱ्याचदा चर्चा करुन सकारात्मकता दर्शविण्यात आलेली आहे. मात्र अद्याप शासनाकडून कोणताही आदेश त्याबाबत निघालेला नाही.
गेल्या 10 वर्षापासून वाढीव पदांवर विना वेतन काम करणाऱ्या शिक्षकांना वेतन मिळणेकामी वाढीव पदांना मंजूरी देण्यासाठी योग्य ती कार्यवाही व्हावी. माहिती तंत्रज्ञान विषय शिक्षक देखील दोन दशकाहून अधिक काळ अनुदानाची वाट पाहत आहेत. याबाबत 18 फेब्रुवारीच्या बैठकीत सकारात्मक कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत.
मात्र त्याची अंमलबावणी झालेली दिसत नसल्याने पुन्हा आदेश देण्याची गरज निर्माण झालेली आहे. विनावेतन कार्य करणाऱ्या शिक्षकांवर करोनामुळे अधिकचे संकट आले आहे. अनेकांची कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. मानवतेच्या दृष्टीकोनातून यावर त्वरीत निर्णय व्हावा, अशी मागणी महासंघाचे अध्यक्ष प्रा.डॉ.संजय शिंदे,. सचिव प्रा.संतोष फाजगे यांनी केली आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक चणचण भासू लागल्याने शासनाने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन दोन टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र हा निर्णय होण्यापूर्वीच शाळा, महाविद्यालयांनी मार्च महिन्याची वेतनाची देयके वेतन पथकाकडे सादर केली आहेत. लॉकडाऊनमुळे वेतनाच्या देयकांमध्ये आता दुरुस्त्या करणे कठीण बनले आहे. त्यामुळे वेतन पथकांना वेतन अदा करण्याबाबत योग्य ते आदेश देण्यात यावेत, अशी मागणीही करण्यात आलेली आहे.