पुणे – महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर पुण्यात दोन महत्वाच्या पोट निवडणूका होणार असल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापायला सुरुवात झाली होती. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे गेल्यावर्षी 22 डिसेंबरला निधन झाले होते. तर चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे यावर्षी 3 जानेवारीला प्रदीर्घ आजाराने निधन झाले होते.
विद्यमान आमदारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा व चिंचवड विधानसभा मतदारसंघात केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे पोट निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र आता या निवडणुकांच्या मतदान दिनाची तारीख आयोगाकडून बदलण्यात असून, आता ह्या निवडणूक 26 फेब्रुवारी रोजी पार पडणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
तर, दुसरीकडे कसबा आणि चिंचवड विधानसभेत भाजप कडून नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागले असतानाच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आता महत्वाची माहिती दिली आहे. नुकतंच कसबा विधानसभा पोटनिवडणुकीनिमित्त पुणे शहर भारतीय जनता पक्षाची बैठक आयोजिण्यात आली होती. यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते.
यावेळी पाटील म्हणाले, ‘कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी पाच नावे प्रदेशस्तरावर कळविण्यात आली आहेत. प्रदेश स्तरावरील बैठकीनंतर तीन नावे अंतिम करून दिल्लीला पाठवली जातील. त्यानंतर एक किंवा दोन तारखेपर्यंत उमेदवार जाहीर होईल,’ असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
‘या’ पाच नावांची आहे जोरदार चर्चा…
कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून मुक्ता टिळक यांचे पती ‘शैलेश, मुलगा कुणाल यांच्याशिवाय हेमंत रासने, धीरज घाटे आणि गणेश बीडकर’ ही नावे सध्या चांगलीच चर्चेत आहेत.