– नीलकंठ मोहिते
इंदापूर (प्रतिनिधी) : सोलापूरच्या खासदारांबद्दल असे म्हणतात. कारण मी म्हणत नाही लोक म्हणतात. मी त्यांना पाच वर्षे बघितले नाही. मी सोलापूरला गेले तरी ते खासदार कधी भेटत नाहीत. व पार्लमेंटला दिल्लीला गेले तरी ते दिसत नाहीत. एक रुपयाचा कडीपत्ता, सोलापूरचा खासदार बेपत्ता, असं मी म्हणत नाही. लोक म्हणतात…’ अशी टिका सोलापूरच्या खासदारांना खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर आयोजित कृषी जनावरे प्रदर्शन घोडेबाजार व डॉग-शो च्या बक्षीस वितरण खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत होत्या.
प्रमुख पाहुणे म्हणून आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार राजन पाटील, पुणे जिल्हा बँकेचे संचालक व बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे, आमदार यशवंतराव माने, बाजार समितीचे सभापती विलासराव माने, उपसभापती रोहित मोहोळकर, बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले, उद्योजक उत्तमराव फडतडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, सागर मिसाळ यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाले की, ‘कांद्याला भाव नाही. दुधाची काय परिस्थिती हे सर्वांना माहिती आहे. माझ्या आयुष्यात माझे पहिले निलंबन कशामुळे झाले तर कांद्याच्या आंदोलनामुळे, कांद्याला भाव मागितला ही माझी चूक होती का? तब्बल तीन वेळा मला दिल्लीच्या संसदेत आपण पाठवले आहे. खरे तर जनतेने दिलेली ही खूप मोठी संधी असते. अतिशय प्रांजलपणे या संधीचे सोने करण्याचा मी प्रयत्न मी सलग पंधरा वर्षे केला आहे.
लोकप्रतिनिधीचे काम जनतेच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी काम करायचे असते. इंदापूर तालुका हा एकच तालुका असा आहे की,दोन आमदार आहेत. मात्र मतदारसंघ दोन आहेत, हक्काचे दोन आमदार असणारा हा तालुका आहे. इंदापूरकरांचे ऋण आणि प्रेम मी आयुष्यभर विसरणार नाही. कारण तीन वेळा त्यांनी प्रेमाच्या विश्वासाच्या नात्याने दिल्लीला जाण्याची संधी दिली अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
बारामतीत राजू दादांनी कृषक नावाचे कृषी विज्ञान केंद्राच्या नावाने शेतकऱ्यांसाठी आयोजित करतात.शेतकऱ्यांना नवीन गोष्टी कळाव्यात यासाठी हा प्रयत्न आहे. तंत्रज्ञानाचा वापर जुन्या पद्धतीची शेती करून आता जमणार नाही. पाण्याची परिस्थिती खूप गंभीर झाली आहे. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी आपापल्या तालुक्यात पाण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी केले तर आभार उपसभापती रोहित मोहोळकर यांनी मानले.
“मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल साठी पाहिजे ती मदत करणार”
जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे हे लढवया आहेत.जेव्हापासून बाजार समितीची सत्ता आप्पासाहेबांच्या हाती आली. तेव्हापासून कोणताही संचालक मिटींगला भत्ता घेत नाही.गाडी वापरत नाही. उलट शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचे कार्य संचालक मंडळ करत आहे.
तालुक्यात आरोग्याची अडचण दूर करण्यासाठीमल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारण्याचे ध्येय आप्पासाहेब यांनी ठेवले आहे.यासाठी तालुक्याचा आमदार म्हणून पाहिजे ती मदत करेल, असा शब्द आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिला.
“आप्पासाहेबांनी शंभर नंबरी सोनं आम्हाला दिले.
मी दहा वर्षे खूप भोगलं परंतु मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी आमचे स्नेही आप्पासाहेब जगदाळे यांनी आमदार यशवंतराव माने यांच्या रूपाने शंभर नंबरी सोनं आम्हाला दिले. आमदार यशवंतराव माने यांच्या नावाची शिफारस आप्पासाहेब जगदाळे यांनीच केली होती.
माझ्या राजकीय 35 वर्षाच्या काराकीरदीत फोन करून, निधी देण्याची किमया पालकमंत्री म्हणून दत्तात्रेय भरणे यांनी करून दाखवली असेही गौरवोद्गार माजी आमदार राजन पाटील यांनी काढले.