सासवड – पुरंदर तालुक्यातील सुपे येथील एका रूग्णाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा रूग्ण पुण्यातील एका खासगी कंपनीत नोकरी करीत आहे. कंपनीमधील एक व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे कंपनीमधील कर्मचाऱ्यांची तपासणी केली असता यात काहीजणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात सुपे गावातील एकाचा समावेश आहे.
कंपनीमध्ये ही व्यक्ती (दि. 22) गेली असता कंपनीने त्याला दवाखान्यात ऍडमिट केले आहे. सुपे येथील रुग्ण व कंपनीमधील डॉक्टर यांच्याकडील माहितीच्या आधारे, बाधित व्यक्ती कंपनीच्या एकाच वेळेच्या गाडीतून प्रवास करीत होती. ही व्यक्ती (दि.16) पासून कंपनीत गेली नाही. परंतु ही व्यक्ती काम करत असलेल्या विभागात पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने सुपेतील बाधित व्यक्ती झाली आहे.
संबंधित विभागात पुरंदर तालुक्यातील 2 व्यक्ती होत्या. एकाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. बसमधून प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गृह विलगीकरणाच्या सूचना प्रशासनामार्फत दिल्या आहेत. प्राथमिक संपर्कामधील 12 जणांना ट्रिपल सी सेंटरमध्ये हलविले आहे.