लोणंद : पाडेगाव (ता. खंडाळा) येथील कॅनाॅलच्या पुलावर झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील एक तरूण सुमारे पन्नास फुट खाली सरदेच्या ओढ्यात कोसळून जागीच ठार तर एक जण जखमी झाला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार या भीषण अपघातात मोटारसायकलवरील निखिल दणाणे (रा. पाडेगाव) हा सुमारे पन्नास फुट उंच पुलावरून खाली कोसळून जागीच ठार झाला असून शुभांकर बगाडे (रा. सरडे ता. फलटण) हा मोटारसायकलस्वार गंभीर जखमी होऊन पुलावरच पडला होता. त्याला उपचारासाठी लोणंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहे.
हा अपघात नीरा उजव्या कालव्याच्या डावीकडील भरावावरून पाडेगाव फार्मच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील सरदाच्या ओढ्यावरील पुलावर रात्रीच्या वेळेस घडला असल्याचे समजते. पहाटे चालत जाणारांना पुलानजीक रस्त्यावर पडलेली मोटरसायकल आणि जखमी शुभांकर बगाडे हा दिसल्यानंतर अपघात घडल्याचे समजले.
अपघाताची माहिती मिळताच लोणंद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम , पोहेकाॅ अविनाश नलावडे, अनिल भोसले यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून शव विच्छेदनासाठी लोणंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले. या घटनेची नोंद लोणंद पोलिस ठाण्यात करण्याचे चालू असून सपोनि विशाल वायकर पुढील तपास करीत आहेत.