लंडन : जगातील सर्वात जुनी लोकशाही समजण्यात येणाऱ्या इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाही आहे. या संसदीय लोकशाहीमध्ये हाऊस ऑफ लॉर्ड्स हे वरिष्ठ सभागृह मानले जाते. या सभागृहाचा सदस्य होण्यासाठी इच्छुकांकडून तब्बल तीस कोटी रुपयांपर्यंत निधी राजकीय पक्षांना देणगी म्हणून द्यावी लागत असल्याची बाब समोर आली आहे.
खरे तर 1925 मध्ये एक कायदा करून हाऊस ऑफ लोर्डचे सदस्यत्व मिळवण्यासाठी पैसे देण्याचा नियम रद्द करण्यात आला होता. पण तरीही आता अनधिकृत पद्धतीने राजकीय पक्षांना देणग्या देऊन या महत्त्वाच्या सभागृहाचा सदस्य होण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये हे सभागृह बरखास्त करावे अशी मागणी आता जोर धरत आहे.
एका स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्याप्रमाणे काँझर्व्हेटिव्ह पार्टीने ज्या सदस्यांना हाउस ऑफ लॉर्ड्सवर सदस्य म्हणून संधी दिली त्यापैकी 15 सदस्यांना पक्षाला मोठी देणगी द्यावी लागली हि देणगी तब्बल तीस कोटी रुपयांची होती, असेही या बातमीत म्हटले आहे. ब्रिटनमधील काही पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी याविरोधात मोहीम उघडण्याचे ठरवले असून ब्रिटनमध्ये हाऊस ऑफ लॉर्ड्स बरखास्त करावे अशी मागणी आता जोर धरत आहे.
भारतात ज्या प्रमाणे राज्यसभेचे कामकाज चालते त्याचप्रमाणे ब्रिटनमध्ये हाऊस ऑफ लॉर्ड्स असते समाजातील तज्ञ लोकांनी या सभागृहाचे सदस्य व्हावे असे मानले जाते. पण पैशाचा व्यवहार करूनच या महत्त्वाच्या सभागृहाचे सदस्यत्व मिळवले जात असल्याने ब्रिटनमधील लोकशाहीबाबत शंका व्यक्त केली जात आहे.