नवी दिल्ली – करोनाच्या साथीदरम्यान चुकीची माहिती किंवा अफवा पसरवल्या जाऊ नयेत, यासाठी सोशल मिडीयामध्ये फेरबदल केले जात आहेत. व्हॉटस ऍप या सोशल नेटवर्किंग ऍपमध्ये आता नव्याने होणार असलेल्या फेरबदलांनुसार एखादा मेसेज कोणलाही फॉरवर्ड करताना एकावेळी एकाच व्यक्ती किंवा ग्रुपला फॉरवर्ड केला जाऊ शकणार आहे. यामुळे “फेक न्यूज’, अफवा किंवा गैरसमज पसरवणारी माहिती मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचवली जाण्यास आळा बसणार आहे.
आतापर्यंत व्हॉट्स ऍपच्या माध्यमातून करोनाशी संबंधित बऱ्याच चुकीच्या माहितीची देवाण-घेवाण झाली आहे. अनेक अफवाही पसरल्या आहेत. तसेच “फेक न्यूज’ही पसरवल्या गेल्या आहेत. त्याला आळा घालण्यासाठी व्हॉट्स ऍपने आता हे नवीन फिचर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
अशा “फेक न्यूज’व्हॉट्स ऍपवरून पसरवणाऱ्यांवर अथवा ग्रुपमध्ये पोस्ट करणाऱ्याबरोबर ग्रुप ऍडमिनवरही कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला आहे. त्यामुळे हजारो ग्रुप ऍडमिननी आपल्या ग्रुपचे सेटिंग बदलून “ओन्ली ऍडमिन कॅन पोस्ट’ असे केले आहे.